पेचप्रसंग! ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेव पुरुष सदस्य विजयी अन् सरपंचपद महिलेसाठी आरक्षित

मांजरी – शेवाळेवाडी ग्रामपंचायत सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. परंतु, या गावाच्या ग्रामपंचायतीत एकमेव उमेदवार कुणाल संदीप शेवाळे हे विजयी झाले आहेत. तर, अकरा सदस्य संख्या असलेल्या शेवाळेवाडी ग्रामपंचायतीतील दहा जागेसाठी कोणीही निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे एकच सदस्य विजयी आणि त्यात सरपंचपद महिलेसाठी आरक्षित शिवाय सदस्य संख्येच्या कोरमअभावी ग्रामपंचायत कारभारही अस्तित्वात आणला जाऊ शकत नाही, यामुळे निवडणूक आयोग प्रशासनापुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील ग्रामंचायत निवडणुकानंतर आता प्रशासनाकडून सरपंच पदाची आरक्षण जाहीर करण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेत समावेश होणाऱ्या पूर्व हवेलीतील शेवाळेवाडी गावाचाही समावेश असून या गावाचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.

महापालिका समावेशाच्या प्रक्रियेत असल्याने शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, 11 सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी एका वॉर्डातून 3 अर्ज दाखल झाले तर एकाने माघार घेतली होती यातून दोन उमेदवारांत लढत झाली. त्यात कुणाल शेवाळे हे विजयी झाले. परंतु, 11 सदस्यांच्या ग्रामपंचायतीसाठी आवश्‍यक असलेला कोरम पूर्ण होत नसल्याने प्रत्यक्षात एका सदस्याने ग्रामपंचायतीचा कारभार अस्तित्वात येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश रामचंद्र चिरमुल्ला यांनी स्पष्ट केले होते.

आता, याच गावाच्या सरपंचपदासाठी प्रक्रियेनुसार सरपंच पदाचे आरक्षण महिलेसाठी जाहीर करण्यात आले आहे. पालिकेत गाव समावेश होईपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचांकडून चालविला जाणार असला तरी तो जुन्या सरपंचाच्या स्वाक्षरीवरच चालवावा लागणार आहे. कारण, नव्या आरक्षणानुसार सरपंचांची नेमणूक करायची झाल्यास ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. परंतु, एकच सदस्य आहे त्यातच सरपंच पदही महिलेसाठी आरक्षित आहे. यातूनच कधीच निर्माण झाली नाही, अशी परिस्थिती शेवाळेवाडी गावात निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसारच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.