संसदेत कॉंग्रेसशी समन्वयाने काम करण्यास तृणमुलला स्वारस्य नाही

कोलकाता – संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात कॉंग्रेसशी समन्वय साधून काम करण्यात तृणमुल कॉंग्रेसला स्वारस्य नसल्याचे संकेत या पक्षाकडून दिले जात आहेत. त्यामुळेच विरोधी पक्ष समन्वयासाठी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी 29 नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या बैठकीला तृणमुल कॉंग्रेस पक्ष अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापी अन्य विरोधी पक्षांशी मात्र समन्वय साधण्याचे काम तृणमुलकडून जारी राहणार आहे असेही सांगण्यात येत आहे.
खरगे यांनी तृणमुलसह सर्व विरोधी पक्षांशी समन्वय साधून सरकारच्या विरोधात रणनिती आखली जाईल असे विधान केले होते. त्यावर पक्षाकडून वरील प्रतिक्रीया देण्यात आली आहे. विरोधी पक्षांशी समन्वय साधण्यापेक्षा कॉंग्रेसने अंतर्गत समन्वय साधून आपला पक्ष नीट चालेल याची आधी दक्षता घेतली पाहिजे अशी प्रतिक्रीया तृणमुलच्या नेत्यांनी दिली आहे.
कॉंग्रेसने आधी आपले घर नीट करावे आणि त्यानंतरच विरोधी ऐक्याचे प्रयत्न करावेत असे एका तृणमुल नेत्याने स्वत:चे नाव न नमूद करता स्पष्ट केले आहे. भाजपशी लढण्यास कॉंग्रेसचे नेतृत्व असमर्थ ठरत आहे त्यामुळे आम्हीच आता भाजप विरोधी आघाडीत अधिक समन्वय साधून काम करू असे या नेत्याने नमूद केले आहे.




