त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी भाविकांसाठी मोठी भेट

नाशिक – प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने नाशिककर आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या विकासाला चालना मिळेल आणि भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.
मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार –
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन महादेवाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्राची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता सरकारने त्र्यंबकेश्वर मंदिराला ‘अ’ दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वर्षभर कोट्यवधी भाविक त्र्यंबकेश्वरला येतात. त्यामुळे पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरलाही ‘अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी ही मागणी पूर्ण झाली आहे.
का आहे गरज?
नगर विकास खात्याने त्र्यंबकेश्वरला ‘अ’ दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराजांचं समाधीस्थळ, महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यामुळे वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे ‘अ’ दर्जाची मागणी सातत्याने होत होती. जानेवारीत विभागीय आयुक्तांनी याबाबत प्रस्ताव पाठवला होता, जो आता मंजूर झाला आहे. हा दर्जा मिळाल्याने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आणि मंदिर प्रशासनाला मोठा फायदा होणार आहे.
नाशिकमधील इतर तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा –
यापूर्वी 3 वर्षांपूर्वी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेत नाशिक जिल्ह्यातील 6 तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा देण्यात आला होता. यात येवल्यातील कोटमगावचं जगदंबा देवस्थान, सिन्नरमधील नांदूरशिंगोटेचं रेणुका माता मंदिर, देवळ्यातील रामेश्वर मंदिर, निफाडमधील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणेचं श्री दत्त मंदिर आणि पिंपळगाव बसवंत येथील श्री राम मंदिर यांचा समावेश आहे.
भाविकांसाठी फायदा –
त्र्यंबकेश्वरला ‘अ’ दर्जा मिळाल्याने मंदिराच्या विकास आराखड्याला गती मिळेल. भाविकांना चांगले रस्ते, स्वच्छता, पाणी आणि इतर सुविधा मिळतील. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी घेतलेला हा निर्णय नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला आणखी उजाळा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





