Bhimashankar Temple : देशात पहिल्यांदाच असा प्रयोग! भीमाशंकरमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची तयारी; काय आहे प्रशासनाचा प्लॅन?
Bhimashankar Temple : २८८ कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत कामांना वेग; पारंपारिक स्थापत्यशैलीचा वापर करून पुरातत्त्व विभागाचा पहिलाच आगळावेगळा प्रकल्प.

Bhimashankar Temple – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. सुमारे पावणेतीन हजार चौरस फुटांच्या सभामंडपाचे काम केवळ चार महिन्यांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येत असून, दगडातील या बांधकामाचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
खेड तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यासाठी २८८ कोटी १७ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. केवळ सभामंडपासाठी १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. कमी वेळेत पारंपरिक साहित्य व तंत्रांचा वापर करून, उत्कृष्ट कारागिरीच्या साहाय्याने पूर्ण झालेला हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार असून, याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
सभामंडपाची रचना
या सभामंडपात एकूण ४८ स्तंभ असून, मध्यभागी घुमट तयार करण्यात येणार आहे. या सभामंडपाचे एकूण क्षेत्र २ हजार ७५० चौरस फूट इतके असेल. यातील स्तंभ दोन ते तीन दगडांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, स्तंभांवर कमानी उभारल्या जाणार आहेत. त्याही तीन दगडांमध्येच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यावर असलेला घुमटदेखील तशाच पद्धतीने उभारला जाणार आहे. हा सभा मंडप तयार करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
“भीमाशंकर मंदिराच्या कामाचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड समावेश होणे केवळ पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या व देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारीही याला अनुकूल आहेत.”
– जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे





