श्रद्धांजली : लोककलेतील ‘मधु’पर्वाची सांगता
चित्रपट, नाटक आणि लोककला अशा तिन्ही क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळ वावरणार्या अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एका वैशिष्ट्यपूर्ण पर्वाची सांगता झाली आहे.

– राजीव मुळ्ये
Madhu Kambikar : चित्रपट, नाटक आणि लोककला अशा तिन्ही क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळ वावरणार्या अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एका वैशिष्ट्यपूर्ण पर्वाची सांगता झाली आहे.
अभिनयातील सहजता, लावणीतील ठसकेबाज अदाकारी आणि लोककलेशी असलेली निष्ठा यांच्या बळावर मधु कांबीकर यांनी मराठी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. विशेषतः पारंपरिक लावणीला चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचविणार्या कलावंतांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांची कलाक्षेत्रातील वाटचाल महाराष्ट्राच्या लोकपरंपरेशी जोडलेली होती. लावणी हा त्यांच्या कलाजीवनाचा गाभा होता. ढोलकीचा ठेका, शब्दांतील सूचक अर्थ, चेहर्यावरील बदलते भाव आणि देहबोलीतून व्यक्त होणारी नजाकत यांचा विलक्षण मेळ त्यांच्या सादरीकरणात दिसत असे. लावणी सादर करताना फक्त नृत्यकौशल्य पुरेसे नसते. त्यासाठी शब्दांची जाण, संगीताची समज, अभिनयाची ताकद आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी आवश्यक असते. या सर्व गुणांचा प्रत्यय त्यांच्या सादरीकरणातून येत असे.
मधु कांबीकर मूळच्या बीड जिल्ह्यातील मालेगाव खुर्द या गावच्या. लोककलेची परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. आई आणि मावशी लावणी कलावंत असल्याने लहानपणापासूनच त्यांना या कलेचे संस्कार लाभले. पुढे पुण्यात त्यांनी कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या व्यावसायिक कलाजीवनाला सुरुवात झाली. लोकनाट्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचा मिलाफ असलेल्या या क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला मोठा इतिहास असला, तरी या कलेला सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रवास सोपा नव्हता. तमाशा आणि लावणीतील कलावंतांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अनेकदा पूर्वग्रहदूषित राहिला. अशा परिस्थितीत मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांच्यासारख्या कलावंतांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर लोककलेचे सामर्थ्य सिद्ध केले.
लोककलेतील सहज अभिनय आणि रंगमंचावरील अनुभव यांचा उपयोग त्यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारतानाही केला. त्यामुळे त्यांच्या अभिनयामध्ये कृत्रिमतेचा स्पर्श कधीही जाणवला नाही. ग्रामीण जीवनातील स्त्री असो किंवा भावनिक गुंतागुंत असलेली व्यक्तिरेखा, त्या भूमिकेचे स्वाभाविक रूप पडद्यावर उभे करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 75 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या. 1980 च्या दशकात मराठी मनोरंजनविश्वात त्यांचा ठसा अधिक ठळक झाला. दादा कोंडके यांच्यासोबत ‘येऊ का घरात’ आणि ‘मला घेऊन चला’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले. लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या माध्यमातून त्यांचा परिचय व्यापक प्रेक्षकवर्गाला झाला. आशयप्रधान चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचे वेगळेपण सिद्ध केले.
दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका केली होती. लोककलावंतांचे आयुष्य, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि रंगमंचामागील वास्तव यांचा वेध घेणार्या या चित्रपटात त्यांच्या अभिनयाला विशेष महत्त्व होते. लावणीच्या सादरीकरणाबरोबरच एका आईच्या व्यक्तिरेखेतील भावनिक छटा त्यांनी समर्थपणे व्यक्त केल्या. लोककलावंत म्हणून मिळविलेला अनुभव अभिनयात किती प्रभावीपणे वापरता येतो, याचे ते उत्तम उदाहरण होते.
‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं बाई’ आणि ‘कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी’ यांसारख्या लावण्यांमुळे त्यांच्या कलाविष्काराची वेगळी ओळख निर्माण झाली. लावणीतील शृंगार व्यक्त करतानाही त्यांचा भर भावाभिनयावर असे. चेहर्यावरील मिश्कील भाव, बोलकी नजर आणि तालाशी साधलेली एकरूपता यामुळे त्यांच्या लावणीचे वेगळेपण सहज लक्षात येत असे. लावणी अभिनयप्रधान लोकनाट्य परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव त्यांच्या सादरीकरणातून होत असे.
त्यांच्या कलागुणांची दखल विविध पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली. खास करून 1982 मध्ये आलेल्या राजदत्त आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘शापित’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयक्षमतेची विशेष दखल घेतली गेली. सरंजामशाही, सामाजिक विषमता आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष यांचे चित्रण करणार्या या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. फिल्मफेअर पुरस्कारांतही त्यांच्या अभिनयाची दखल घेण्यात आली.
‘शापित’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लोककलेतून आलेली अभिनेत्री गंभीर आशयाच्या चित्रपटातही किती समर्थपणे भूमिका साकारू शकते, हे त्यांनी या चित्रपटातून दाखवून दिले. 2018 मध्ये त्यांना झी चित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण आयुष्यभर रंगमंचावर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविणार्या मधुताईंना स्वतःचा सन्मान स्वीकारण्यासाठीही उपस्थित राहता आले नाही.
हे त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील वेदनादायी वास्तव होते. ज्या रंगमंचाला त्यांनी आयुष्य वाहिले, त्याच रंगमंचावरील सादरीकरणादरम्यान त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. 2016 मध्ये मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरातील लावणी कार्यक्रमात त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांच्या शरीराच्या एका बाजूवर परिणाम झाला आणि त्यांचे सक्रिय कलाजीवन जवळजवळ थांबले. पुढील अनेक वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत चढउतार होत राहिले; मात्र रंगमंचावर पुन्हा पूर्वीप्रमाणे उभे राहणे त्यांना शक्य झाले नाही.
आधुनिक मनोरंजनाच्या बदलत्या प्रवाहात तमाशा, लावणी आणि इतर लोककलांचे स्थान टिकविण्याचे आव्हान अधिक गंभीर होत असताना मधु कांबीकर यांच्यासारख्या कलाकारांचे योगदान नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या कलेतून मराठी मातीचा अस्सल गंध जपला. पडद्यावरील भूमिका, रंगमंचावरील अदाकारी आणि लावणीतील त्यांची अभिव्यक्ती रसिकांच्या सदैव (Madhu Kambikar) स्मरणात राहील.






