– आशिष निनगुरकर
मराठी आणि हिंदी चित्रपटांसह सर्वच प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, त्यात आपल्या सणांचे गाण्यातून किंवा एखाद्या प्रसंगातून दर्शन घडते.”दिवाळी’ सणाचे औचित्य साधत अशाच काही चित्रपट व गाण्यांचा घेतलेला हा मागोवा…
दिवाळीच्या दिवसांमध्ये “दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने दिवाळीतील प्रत्येक सकाळ उत्साह आणि आनंदाने उजाडते. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरी दिवाळी साजरी होणार याचा एक निराळा आनंद असतो. अशा वेळी “आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गाणं तुमच्या मनाला अधिकच प्रसन्न करू शकते. “अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील गाणं दिवाळीत प्रत्येक कार्यक्रमात अथवा घरोघरी ऐकलं जातं. “अष्टविनायक’ हा चित्रपट राजदत्त यांनी दिग्दर्शित केला होता.
यातील “आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गाणं अभिनेता सचिन पिळगावकर आणि वंदना पंडित यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. “आई पाहिजे’ या आशा काळे यांच्या चित्रपटातही एक दिवाळीचे गाणे आहे. या चित्रपटात आशा काळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ज्यामध्ये भूतकाळाची आठवण काढताना दिवाळीवर आधारित एक गाणे दाखवण्यात आले होते. “आली दिवाळी आली दिवाळी’ या गाण्यातून घरोघरी साजरी होणाऱ्या दिवाळीच्या सणाचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. यातील सुंदर बोल ऐकून घरातील दिवाळीचे वातावरण अधिकच प्रसन्न होते.
मराठी चित्रपटातील पहिले दिवाळी गीत प्रभात फिल्म कंपनीच्या माणूस (1939) या चित्रपटात होते. दिग्दर्शक आणि संकलक चित्रपती व्ही. शांताराम यांच्या या चित्रपटात “दिवाळी दिवाळी आली’ हे गाणे आहे. हे गाणे अनंत काणेकर यांनी लिहिले असून संगीत मास्टर कृष्णराव यांचे आहे. चित्रपटाच्या नावातच दिवाळी सांगायची तर, 1955 साली वैभव चित्रचा “भाऊबीज’ (कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाइट) हा सामाजिक चित्रपट आला. या चित्रपटाची पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन राजन कुमार यांचे आहे तर कथा, संवाद आणि गीते कवी संजीव यांची आहे. या चित्रपटात सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विशेष म्हणजे, “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळिते भाऊराया’, हे या चित्रपटातील गाणे सर्वकालीन लोकप्रिय आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये बहिणीला सर्वात जास्त ओढ असते ती म्हणजे भाऊबीजेची. कारण त्या निमित्ताने भाऊराया खास बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी येतो. या दिवशी भावाकडून छानसं गिफ्ट घेण्यात एक मजा असते. त्यामुळे अशा सुंदर क्षणासाठी “भाऊबीज’ या चित्रपटातील “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया’ हे गाणं नक्कीच छान वाटते. गणेश भट्ट दिग्दर्शित “ते माझे घर’ (1963) या चित्रपटातील “दिव्या दिव्यांची ज्योत सांगते’ या गाण्याचा खास उल्लेख हवाच. पडद्यावर सीमा देव यांनी हे गाणे साकारले आहे.
1975 मध्ये दत्ता केशव दिग्दर्शित “ओवाळिते भाऊराया’ हा कौटुंबिक चित्रपट पडद्यावर आला. यात रमेश देव, सीमा देव, रविराज, रुही, वत्सला देशमुख, विवेक, राजा नेने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीते जगदीश खेबूडकर आणि दत्ता केशव यांची असून संगीत प्रभाकर जोग यांचे आहे. हाही चित्रपट कृष्ण धवल आहे. त्यानंतर अनेक वर्षांनंतर 2003 मध्ये अभिजित चित्रचा “भाऊबीज’ हा रंगीत सामाजिक चित्रपट पडद्यावर आला. प्रमोद शिंदे निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन अरविंद पोवार यांचे आहे, तर या चित्रपटात प्रमोद शिंदे, अलका कुबल, मधु कांबीकर, अशोक शिंदे, निशिगंधा वाड, कुलदीप पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
2007 मध्ये सुभाष फडके दिग्दर्शित “ओवाळिते भाऊराया’ हा रंगीत सामाजिक चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाची कथा पटकथा संवाद नीता देवकर यांचे आहे. गीते प्रवीण दवणेची तर संगीत नंदू होनप यांचे आहे. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी, प्रिया बेर्डे, स्मिता तळवळकर, तृप्ती भोईर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गॅगरी अल्मेडा हे या चित्रपटाचे निर्माते होते.
हिंदी चित्रपटातील दिवाळी गाणी हा खूप अगोदरपासूनचा फंडा आहे. सर्वप्रथम 1940 साली दिग्दर्शक जयेश देसाई यांचा “दिवाली’ हा चित्रपट आला. चित्रपटाचे नाव आणि थीममध्ये हा पहिलाच दिवाळी चित्रपट. तर बॉम्बे टॉकीज निर्मित आणि ग्यान मुखर्जी दिग्दर्शित “किस्मत’ ( 1943) “घर घर मे दीवाली मेरे घर मे अंधेरा क्यू हे’ गाणे आहे. दिग्दर्शक एम. सादिक यांच्या “रतन’ (1944) या चित्रपटात “आयी दीवाली आयी दीवाली’ हे गाणे आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या दिवाळीवरचे मजेशीर गाणे सांगायचे तर एम. एस. वासन दिग्दर्शित पैगाम (1959) या चित्रपटातील जॉनी वॉकरने साकारलेले “कैसी दीवाली मनाए लाला अपना तो बारह मैने दीवाला’ हे आहे. यात सामाजिक आशयही आहे.
तर “हरियाली और रास्ता’ या चित्रपटातील “लाखो तारे आसमॉं पर एक’ या गाण्यात भावपूर्णताही आहे. युद्धपटातही दीवाली गीताला पटकथेत स्थान मिळाले आहे. चेतन आनंद दिग्दर्शित “हकीकत’ मध्ये “आयी अब के साल दिवाली’ हे गाणे आहे. येथपर्यंत कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाइट सिनेमातील दिवाळी पाहायला मिळते. त्या काळातील सबसे बडा रुपय्या (1955), पैसा (1957), खजांची (1958) या चित्रपटातही दिवाळीचे गाणे आहे. विजय आनंद दिग्दर्शित “गाइड’ (1967) मध्ये “पिया तो से नैना लागे रे’ या एकाच गाण्यात अनेक सण आहेत आणि वहिदा रेहमानने अतिशय क्लासिक नृत्यातून ते साकारले आहे. त्यात दिवाळीही आहेच.
प्रमोद चक्रवर्ती निर्मित आणि दिग्दर्शित जुगनू (1973) या चित्रपटातील धर्मेंद्र आणि लहान मुलांवरचे “दीप दीवाली के झूठे’ (गीत आनंद बक्षी, संगीत सचिन देव बर्मन) हे गाणे लोकप्रिय झाले होते. काळ पुढे सरकला तरी चित्रपटातील “दिवाळी सण’ कायमच राहिला. या दशकाच्या सुरुवातीलाच बिग बजेट चकाचक मनोरंजक चित्रपटाची निर्मिती वाढली, त्यातही मल्टीप्लेक्सच्या भव्य पडद्यावर दिवाळी सण दणक्यात साजरा होऊ लागला. करण जोहर दिग्दर्शित “कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात “कभी खुशी कभी गम’ असे दिवाळी सण गाणे आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, राणी मुखर्जी इत्यादी श्रीमंती रूपावर ते आहे.
या गाण्यात दिवाळी पूजा, लखलखाट, भलं मोठं घर असे बरेच काही आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास (2001) या चित्रपटातील “सिलसिला यह चाहत का’ हे गाणे पूर्णपणे वेगळ्या पठडीतील आहे. दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या जंजीर ( 1973)च्या सूडकथेत दिवाळी सणाचा नाट्यपूर्ण वापर केला आहे. पटकथा, संवाद लेखक सलिम जावेद यांनी विजय (अमिताभ बच्चन) लहान असताना दिवाळीच्या दिवशीच तेजा (अजित) विजयच्या आई पित्याची हत्या करतो. बिलिंडग परिसरात फुटत असलेल्या फटाक्यांच्या आवाजात हे पिस्तुलाच्या गोळीचे आवाज मिक्स होतात.
गाण्याव्यतिरिक्तही चित्रपट आणि चित्रपटसृष्टीत दिवाळीचा संदर्भ/संबंध आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जन्मला म्हणून लक्ष्याचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे असे ठेवले आणि तो आपल्या वाढदिवसाची आणि दिवाळीची पार्टी टू इन वन करे. तर एम. बी. सामंत निर्मित आणि राजदत्त दिग्दर्शित अरे संसार संसार ( 1981)च्या कोल्हापुरातील शूटिंगच्या वेळी सेटवर रंजनाने तंत्रज्ञ व कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. हा संपूर्ण चित्रपट कोल्हापूरमध्ये चित्रीत होत असतानाच दिवाळीही आली. मराठी चित्रपटाच्या सेटवर कौटुंबिक वातावरण असल्याने सणही साजरे होत. घरीच ऐका दिवाळीची ही सदाबहार गाणी, ज्यामुळे घर बसल्या तुम्हाला दिवाळीचा आनंद द्विगुणित करता येईल.