Manchar : टोरेंटसह प्रस्तावित प्रकल्पांना आदिवासींचा विरोध
Manchar : या मुद्द्यांबाबत गावागावांत जनजागृती करण्याचे बैठकीत ठरले. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन पेसा कायद्यांतर्गत महाग्रामसभा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

मंचर : कर्जत येथील टोरंट प्रकल्पासह फुलावडे, गंगापूर, आपटी आणि कानसे परिसरातील प्रस्तावित विद्युत पंप साठवण प्रकल्पांना खेड व आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी भीमाशंकर येथील कळमजाई माता मंदिरात बैठक घेण्यात आली. जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
बैठकीला विविध गावांचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल वनघरे यांनी या प्रकल्पांबाबत आपली भूमिका मांडली. प्रकल्पांमुळे जंगलतोड, पर्यावरणाचा समतोल आणि जलस्रोतांवर संभाव्य परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मुद्द्यांबाबत गावागावांत जनजागृती करण्याचे बैठकीत ठरले. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन पेसा कायद्यांतर्गत महाग्रामसभा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत.
प्रकल्पांसंदर्भातील सविस्तर माहिती वन विभागाकडून मागविण्यात आली आहे. आदिवासी समाजाचे हक्क, निसर्गसंपत्ती आणि भावी पिढ्यांचे हित जपण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.





