Pune District : वाफगाव-रेटवडी गटात तिरंगी लढत

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वाफगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे असून निवडणुकीपूर्वीच प्रचारामुळे उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून संभाव्य उमेदवार अश्विनी पाचारणे व माजी जि. प. सदस्या डॉ. रोहिणी राक्षे, तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दीप्ती भोगाडे आणि शिवसेना (शिंदे गट) कडून रोहिणी थिगळे या चार महिला नेत्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दि. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी वाफगाव-रेटवडी गटात आजपर्यंत (दि. 19) एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून नेमकी कोण उमेदवार असेल, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. चारही संभाव्य उमेदवार सक्षम व सक्रिय नेतृत्व करणार्या असल्याने लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे.
या गटात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी मुबलक पाण्याची समस्या, ठाकर वस्त्यांचा सर्वांगीण विकास, रस्ते, सुरळीत बससेवा, शिक्षण व आरोग्य असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुकीपूर्वीचा प्रचारखर्च पाहता उमेदवार सक्षम असल्याचे चित्र आहे. मात्र हे प्रश्न प्रत्यक्षात कितपत सोडवले जातील, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीपूर्वीच प्रचारात आघाडी
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही उमेदवारांनी गटातील गाव-वाड्या पिंजून काढत आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी व औषधवाटप, साड्यांचे वाटप, तसेच देव-देवतांच्या सहलींचे आयोजन करून मतदारांशी संपर्क वाढविला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांत सहभाग, लोकांच्या सुख-दुःखात उपस्थिती आणि सर्व वयोगटांशी थेट संवाद यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतरही कार्यकर्ते व कुटुंबीयांच्या माध्यमातून संपर्क मोहिम सुरूच आहे.
तिकिटासाठी स्पर्धा
तिकिटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये स्पर्धा असली तरी शिवसेना (शिंदे गट) कडून रोहिणी थिगळे आणि उबाठा गटाकडून दीप्तीताई भोगाडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कोटींच्या खर्चाच्या चर्चेत असलेल्या या लढतीत मतदार कोणाला संधी देणार आणि कोणता पक्ष बाजी मारणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.





