PMC Dangerous Buildings – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३६ धोकादाक इमारती (वाडे) रिकामे करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यानंतर आता महापालिकेच्या चाळ विभागाकडील सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सात वसाहतींमधील इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक झाल्याने त्या तातडीने रिकाम्या करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. या सर्व वसाहतींमध्ये मिळून ८४५ महापालिका सदनिका, १०५९ बिगर महापालिका सदनिका असून, एकूण १९०४ सदनिका आहेत. अगामी पावसाळ्यात अतिवृष्टी, ढगफुटी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे इमारतींचे भाग कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वसाहतीमधील रहिवासी घरे सोडत नसल्याने आता महापालिकेने आता जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून हेल्थ कॅम्प पांडवनगर, छत्रपती संभाजीनगर वाकडेवाडी, घोरपडी पेठ येथील कॉलनी क्रमांक ८ व ९, राजेवाडी, साने गुरुजीनगर आंबील ओढा तसेच राजेंद्रनगर या वसाहती धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, घोले रस्ता- छत्रपती शिवाजीनगर, भवानी पेठ आणि कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील या वसाहतींची संयुक्त तपासणी करून भवन रचना विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. पुणे महापालिका. त्या अहवालात संबंधित इमारतींमध्ये वास्तव्य करणे धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका अधिनियमाच्या कलम २६४ व २६८ अन्वये प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, संबंधित रहिवाशांना पर्यायी निवासासाठी नंदन ॲक्वारा, बालेवाडी, संत ज्ञानेश्वर सहकारी गृहरचना, चव्हाणनगर तसेच हडपसरमधील उपलब्ध सदनिकांमध्ये तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागारिकांनी इमारतींमध्ये राहणे सुरू ठेवल्यास संबंधित नागरिक स्वतःच्या जबाबदारीवर राहत असतील, असे स्पष्ट करीत संभाव्य दुर्घटनेस पुणे महापालिका जबाबदार राहणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. धोकादायक घोषित वसाहती -हेल्थ कॅम्प, पांडवनगर –छत्रपती संभाजीनगर, वाकडेवाडी -घोरपडी पेठ कॉलनी क्र. ८ -घोरपडी पेठ कॉलनी क्र. ९ -१२/बी राजेवाडी -साने गुरुजीनगर, आंबील ओढा -राजेंद्रनगर, सदाशिव पेठ