Travis Head smashes 123-year-old record : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ॲशेस कसोटीत पर्थ येथे वादळी खेळी करत इतिहास रचला. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या सामन्यात, हेडने ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह अविश्वसनीय १२३ धावांची तुफानी खेळी केली. त्याने केवळ ६९ चेंडूत शतक पूर्ण केले. यासह त्याने पाच मोठे विक्रम रचत १२३ वर्षांचा विक्रम मोडला. खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १९ विकेट्स पडल्या होत्या, अशा परिस्थितीत उस्मान ख्वाजा जखमी झाल्यामुळे हेडला सलामीला येण्याची संधी मिळाली आणि त्याच्या या स्फोटक शतकामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने २०५ धावांचे लक्ष्य २८.२ षटकांत पूर्ण करत ८ विकेट्सने विजय मिळवला. हेडच्या या एकाच खेळीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल पाच मोठे कीर्तिमान स्थापित झाले आहेत. ट्रेव्हिस हेडने रचलेले ५ मोठे विक्रम – १२३ वर्षांचा जुना विक्रम मोडला: कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात (धावांचा पाठलाग करताना) सर्वात जलद शतक (६९ चेंडू) ठोकण्याचा पराक्रम हेडने केला. यासह त्याने इंग्लंडच्या गिल्बर्ट जेसॉपचा (१९०२ मध्ये ७६ चेंडू) १२३ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. ॲशेसमध्ये दुसरे जलद शतक: ॲशेसच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. या यादीत ॲडम गिलख्रिस्ट (५७ चेंडू, २००६) अव्वल स्थानी आहे. सर्वाधिक स्ट्राईक रेट: कसोटीच्या यशस्वी रन चेसमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट (१४८.१९) नोंदवणारा तो फलंदाज ठरला. त्याने जॉनी बेअरस्टोचा (१४७.८२) विक्रम मोडला. संयुक्त जलद ओपनर शतक: कसोटीत संयुक्तपणे सर्वात जलद शतक ठोकणारा तो सलामीवीर बनला (६९ चेंडू). त्याने डेव्हिड वॉर्नरच्या (२०१२) विक्रमाशी बरोबरी साधली. कसोटीतील ५ वे जलद शतक: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (६९ चेंडू) हेड संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. हेही वाचा – AUS vs ENG : ‘तो ट्रेनसारखा धावत होता…’, ट्रॅव्हिस हेडच्या वादळी शतकावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया हेडच्या खेळीने सामना निसटला – बेन स्टोक्स पराभवानंतर बोलताना बेन स्टोक्सने ट्रॅव्हिस हेडच्या १२३ धावांच्या खेळीचे विशेष कौतुक केले. हेडने केलेल्या वादळी शतकामुळे २०५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकाच सत्रात पूर्ण केले. स्टोक्स म्हणाला, “मी थोडा हादरलो होतो. त्याची (हेडची) खेळी अविश्वसनीय होती, ती काही साधी खेळी नव्हती. आमच्या फलंदाजांनी सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅव्हिसने ज्या पद्धतीने खेळ केला, त्यामुळे सामना आमच्या हातून निसटला.”