Ben Stokes Statement on Travis Head : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अवघ्या दोन दिवसांत संपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडच्या तुफानी खेळीचे कौतुक करताना तो कसा ‘अविश्वसनीय’ होता, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. हेडच्या खेळाने सामना निसटला पराभवानंतर बोलताना बेन स्टोक्सने ट्रॅव्हिस हेडच्या १२३ धावांच्या खेळीचे विशेष कौतुक केले. हेडने केलेल्या वादळी शतकामुळे २०५ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकाच सत्रात पूर्ण केले. स्टोक्स म्हणाला, “मी थोडा हादरलो होतो. त्याची (हेडची) खेळी अविश्वसनीय होती, ती काही साधी खेळी नव्हती. आमच्या फलंदाजांनी सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण ट्रॅव्हिसने ज्या पद्धतीने खेळ केला, त्यामुळे सामना आमच्या हातून निसटला.” योजना आखल्या, पण तो ‘ट्रेनसारखा धावत होता’ – ट्रॅव्हिस हेडला रोखण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांनी अनेक योजना आखल्या, पण हेडच्या आक्रमकतेपुढे त्या सर्व निष्फळ ठरल्या. याबद्दल बोलताना स्टोक्स म्हणाला, “आम्ही हेडसाठी ३-४ वेगवेगळ्या योजना आखल्या, पण तो अक्षरशः ट्रेनसारखा धावत होता. धावा इतक्या वेगाने येत होत्या की त्या थांबवणं खूप कठीण झालं.” हेही वाचा – AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने केला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘या’ मोठ्या विक्रमांची केली नोंद गोलंदाजांचे कौतुक आणि पुढील सामन्यावर लक्ष इंग्लंडने हा सामना गमावला असला तरी, स्टोक्सने आपल्या गोलंदाजांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तो म्हणाला, “काल आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती अविश्वसनीय होती. एकाच दिवशी १९ विकेट्स पडल्या.” आता हा पराभव विसरून दुसऱ्या कसोटीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्याने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु होणार आहे, ज्यासाठी खेळाडू अजून मेहनत घेतील, असा विश्वास स्टोक्सने व्यक्त केला.