दिवाळीच्या तोंडावर लालपरीचा प्रवास महागला! एसटीच्या भाड्यात 10 टक्के वाढ

मुंबई : सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य बस सेवांच्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १५ ऑक्टोबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लागू असेल. मात्र, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस सेवांना या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.
कोणाला लागू होणार भाडेवाढ?
एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, १४ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्रीनंतर प्रवास सुरू करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुधारित भाडेदरानुसार तिकिटे घ्यावी लागतील. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, त्यांच्याकडून जुन्या आणि नव्या भाडेदरातील फरक वाहकाद्वारे वसूल केला जाईल. उदाहरणार्थ, १०० रुपयांचे तिकीट असलेल्या प्रवासासाठी आता ११० रुपये मोजावे लागतील. मात्र, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवास सुरू होऊन त्याच दिवशी किंवा त्यानंतर संपणाऱ्या प्रवाशांकडून हा फरक वसूल केला जाणार नाही.
दिवाळीनंतर मूळ दर लागू –
दिवाळीच्या गर्दीचा हंगाम संपल्यानंतर, म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२५ पासून एसटी महामंडळ पुन्हा मूळ भाडेदरानुसार आकारणी करेल. यामुळे प्रवाशांना २५ जानेवारी २०२५ पासून लागू असलेल्या दरांनुसार भाडे द्यावे लागेल.
वाहकांसाठी विशेष सूचना –
एसटी महामंडळाने वाहकांसाठीही विशेष सूचना जारी केल्या आहेत. सर्व आगारांमध्ये ईटीआय (इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन) द्वारे तिकीट विक्री केली जाते. या मशीनमध्ये सुधारित भाडेदर लागू करण्यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेडद्वारे तांत्रिक बदल केले जाणार आहेत. वाहकांना सूचित करण्यात आले आहे की, मशीनमध्ये सुधारित दर कार्यान्वित झाल्याची खात्री करावी. जर एखादा वाहक भाडेवाढ लागू होण्यापूर्वी कामगिरीवर गेला असेल, तर त्याने ईटीआय मशीनमधील ‘Fare calc’ आणि ‘SYNC EXTRA ROUTE’ पर्याय निवडून सुधारित दर लागू करावेत, जेणेकरून तिकीट प्रणाली अद्ययावत होईल.
प्रवाशांवर आर्थिक बोजा
दिवाळीच्या काळात लाखो प्रवासी गावाकडे जाण्यासाठी एसटी बसचा वापर करतात. सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक म्हणून ओळखली जाणारी ‘लालपरी’ आता यंदा महागडी ठरणार आहे. गावखेड्यापासून लांब पल्ल्याच्या रातराणी बसपर्यंत सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. यापूर्वी २४ जानेवारी २०२५ पासून एसटीच्या भाड्यात १४.९५ टक्के वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा ही भाडेवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे.
प्रवाशांचा संताप –
राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असताना, आता सणासुदीच्या काळात सार्वजनिक वाहतुकीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. खासगी वाहनांचा वापर वाढला असला, तरीही एसटी बस हा अनेकांचा सुरक्षित प्रवासाचा पर्याय आहे. मात्र, या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरत आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे दिवाळीचा आनंद काहीसा फिका पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांना आता गावी जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याने, यंदाचा सण खऱ्या अर्थाने ‘महागडा’ ठरणार आहे.





