Maharashtra State Transport Corporation : महाराष्ट्रातील ग्रामीण भाग तसेच शहरी भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अर्थात लालपरी धाव जात असते. सर्वसामान्य नागरिकांपासून अनेकांचा कल एसटीने प्रवास करण्याकडे असतो. एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास असे सांगितले जाते. मात्र, अनेकदा एसटी तांत्रिक कारणामुळे किंवा इतर कारणामुळे प्रवासादरम्यान बंद पडते. यामुळे मोठ्या अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड, अपघात किंवा अन्य कारणामुळे प्रवास खंडित झाल्यास त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या कोणत्याही एसटी बसमधून मग ती साधी, निमआराम, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी असली तरी विनाशुल्क व तातडीने प्रवासाची सुविधा मिळणार आहे. याबाबतचे आदेश परिहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ई-शिवाई बसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. तसेच काही प्रकरणांमध्ये प्रवाशांकडून तिकिटाच्या फरकाची रक्कम मागितली जात असल्याचे समोर आले होते. यानंतर मंत्री सरनाईक यांनी तक्रारींची दखल घेत आदेश काढले आहेत. जर संबंधित वाहन व चालकाने प्रवेश नाकरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.
एशियाड, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही किंवा ई-शिवाई बसमध्ये प्रवेश नाकारल्यास प्रवाशांनी तत्काळ आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रण किंवा विभाग नियंत्रकांकडे तक्रार करावी, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास सुलभ होऊन मनस्तापापासून सुटका होणार आहे.