नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकर उत्पन्न मर्यादेत 12 लाखापर्यंत वाढ केली होती. दरम्यानच्या काळात 22 सप्टेंबर पासून विविध वाहनावरील जीएसटी कर कमी करण्यात आला. त्यामुळे सरलेल्या वर्षात प्रवासी वाहनांची विक्री तब्बल 45.5 लाख युनिट इतकी झाली आहे. वार्षिक पातळीवर या विक्रीत तब्बल सहा टक्क्याची वाढ झाली असल्याचे या उद्योगांनी सांगितले. 2024 मध्येही वाहन कंपन्यांची घाऊक विक्री 45.05 लाख युनिट इतकी विक्रमी पातळीवर झाली होती. 2025 मध्ये हा विक्रम मोडला गेला. ज्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, टोयाटा किर्लोस्कर मोटार, स्कोडा इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे. भारतातील महिंद्रा कंपनी आणि टाटा मोटर्स कंपनीने या वर्षात उत्तम कामगिरी केली असून या कंपन्या आता दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहेत. तर चौथ्या क्रमांकावर दक्षिण कोरियातील ह्युंदाई कंपनी गेली आहे. एसयुव्ही प्रकारातील वाहनांची विक्री 2025 मध्ये एकूण वाहनांच्या 55.8% इतकी होती. 2024 मध्ये हे प्रमाण 53.8% इतके होते. याचा अर्थ या वाहनांची विक्री वार्षिक पातळीवर वाढत आहे. सरलेल्या वर्षांमध्ये छोट्या कारची विक्रीही वाढू लागली असल्याचे दिसून येते. जीएसटी सुधारणामुळे छोट्या कार घेणे आता मोटरसायकल चालकांना परवडत असल्याचे दिसून येते. 2025 मध्ये मारुती सुझुकी इंडिया कंपनीची कार विक्री वाढून 18.44 लाख युनिटवर गेली आहे. 2024 मध्ये ही संख्या 17.90 लाख होती. जीएसटी कपातीपूर्वी या क्षेत्रात काही प्रमाणात मरगळ आली होती. मात्र जीएसटी कपातीनंतर ही मरगळ संपुष्टात आली असल्याचे दिसून येते. डिसेंबर महिन्यातही वाहन विक्री वाढल्याचा दाखला कंपनीचे संचालक पार्थो बॅनर्जी यांनी दिला. टाटा मोटर्सची विक्री गेल्या पाच वर्षापासून वाढत आहे. 2025 मध्ये कंपनीने 5.8 लाख युनिट कार विकल्या. यामध्ये 81,000 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीची विक्री या वर्षात 6.6 टक्क्यांनी वाढून 58,702 युनिट झाली आहे. 2024 मध्ये या कंपनीची 42,416 वाहने विकली गेली होती. टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनीचे विक्री यावर्षी तब्बल 19 टक्क्यांनी वाढून 3.88 लाख युनिट झाली आहे. 2024 मध्ये या कंपनीचे 3.26 लाख वाहने विकली गेली होती. स्कोडा ऑटो इंडिया कंपनीची 2025 मध्ये 72,665 वाहने विकली गेली. 2024 मध्ये या कंपनीची 35,166 वाहने विकली गेली होती.