राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, पाहा संपूर्ण यादी….

मुंबई – सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. राजकीय नेत्यांसोबत खटके उडत असल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची आधीच महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र, त्याच बरोबरच कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
त्यांच्या याच स्वभामुळे त्यांची वारंवार बदली करण्यात येते. गेल्या वर्षीच पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदल करण्यात आली होती. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे. तर त्यांच्या आधीचा कार्यभार हा राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
कायमच चर्चेत राहिलेले मुंढे यांनी ऑगस्ट 2005 मध्ये प्रशासकीय सेवेला सुरूवात केली होती. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द गाजली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या 19 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 20 वेळा बदली झाली आहे. आता त्यात आणखी एका बदलीची भर पडली आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्यात एक वर्ष आणि त्या आधी एक वर्ष त्यांनी मराठी भाषा विभागात काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार खात्याचे काम देण्यात आले आहे.
प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुने मुंढे नेहमीच प्रयत्न करत असतात.
यामुळेच त्यांच्या बदल्या होत असल्याचीही चर्चा असते. तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत.
बदली झालेले अधिकारी व कार्यभार
- तुकाराम मुंडे – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
- रणजीत कुमार – अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे
- नीमा अरोरा – सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबई
- व्ही राधा – प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
- अमन मित्तल – सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबई
- अमगोथू श्रीरंगा नायक – आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
- रोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)





