AAP: आम आदमी पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षाचे नेते संजय सिंह यांनी या खासदारांवर तीव्र टीका करत त्यांना “पंजाबचे विश्वासघातकी” असे संबोधले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना सिंह यांनी भाजपवर गंभीर आरोप करत “ऑपरेशन लोटस”द्वारे पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारचे कामकाज खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. “भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबमधील चांगल्या कामांना अडथळा आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पंजाबच्या जनतेने या सातही खासदारांची नावे लक्षात ठेवावीत, त्यांना जनता कधीच माफ करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. ते राज्याचे विश्वासघातकी – या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भाजपमध्ये जाणाऱ्या खासदारांवर निशाणा साधत “हे खासदार पंजाबचे प्रतिनिधित्व करत नाहीत, ते राज्याचे विश्वासघातकी आहेत,” असे स्पष्ट केले. तसेच भाजपमध्ये जाऊनही त्यांना कोणताही फायदा होणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. “भाजपने पुन्हा एकदा पंजाबकरांशी विश्वासघात केला,” असा आरोप त्यांनी केला. याआधी राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात फूट पडल्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या एकूण १० खासदारांपैकी दोन-तृतीयांश म्हणजे सात खासदारांनी घटनात्मक तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. या सात खासदारांमध्ये हरभजन सिंह, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत सिंह साहनी आणि स्वाती माळीवाल यांचाही समावेश असल्याचे चड्ढा यांनी सांगितले. मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव झाली – या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना चड्ढा यांनी आम आदमी पक्ष मूळ विचारधारेपासून दूर गेल्याचा आरोप केला. “मी या पक्षासाठी १५ वर्षे दिली, मात्र आता पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे. गेल्या काही वर्षांत मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव झाली. त्यामुळे आज मी पक्षापासून दूर होत असून जनतेजवळ जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्यावर भाजपबाबत मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना चड्ढा यांनी हे सर्व नियोजित आणि समन्वित अभियान असल्याचे म्हटले होते. “माझ्याविरोधात एकाच प्रकारच्या आरोपांची पुनरावृत्ती होत आहे. हे योगायोग नसून एक नियोजित हल्ला आहे. सुरुवातीला मी प्रतिक्रिया देणे टाळले, मात्र खोटे वारंवार सांगितल्यास ते खरे वाटू शकते, म्हणून मी उत्तर देण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.