‘संकल्प’द्वारे तरुणांना देणार प्रशिक्षण

आस्थापनांमधील रिक्त जागांची माहिती द्यावी : “कौशल्य विकास व उद्योजकता’चे आवाहन
पुणे – पुण्यात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. विविध उद्योगधंदे तसेच कंपन्यांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा व या जागांसाठी आवश्यक असणारी पात्रता ही माहिती उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास समितीला द्यावी. त्यानुसार “संकल्प’ प्रकल्पाद्वारे तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर आवश्यक पात्रता पूर्ण असणारे कुशल मनुष्यबळ कंपन्यांना पुरविणे सोपे जाईल. यातून गरजू आणि पात्र तरुणांना रोजगार मिळेल, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अपर सचिव ज्युथिका पाटणकर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या संकल्प प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उद्योजकता संचालनालयाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक शरद आंगणे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या “संकल्प’ या प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देणे शक्य होणार असून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास समितीने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. संकल्प प्रकल्पाअंतर्गत विविध विभागांमार्फत, संस्थामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्ह्यात उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच उपलब्ध होऊ शकणारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यांचा विचार करून पुणे जिल्हयाचा सन 2020-21 साठीचा कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.
जिल्हा समितीने कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाबाबतची माहिती अद्ययावत करून त्यानुसार कंपनीला मनुष्यबळ पुरविल्यास जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देणे शक्य होईल. पुणे जिल्हा समितीच्या वतीने या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्यानुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
ज्युथिका पाटणकर, अपर सचिव




