कांताराच्या सेटवर दु:खद घटना; ज्युनिअर आर्टिस्टचा नदीत बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Kantara set death : मंगळवार ७ मे रोजी ‘कांतारा २’ च्या सेटवर एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. कोल्लूर सौपर्णीका नदीत बुडून एका ज्युनियर कलाकाराचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, केरळमधील रहिवासी एमएफ कपिल हे जेवणाच्या सुट्टीनंतर नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीचा प्रवाह आणि वेग अधिक असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहून गेले होते.
स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. मात्र, मंगळवारी संध्याकाळी कपिलचा यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. ‘कांतारा २’ च्या सेटवर अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कोल्लूरमध्ये ज्युनियर कलाकारांना घेऊन जाणारी बस उलटली होती. मात्र, या घटनेत कोणलाही गंभीर दुखापत झाली नव्हती.
या चित्रपटाच्या शुटिंगसाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य सेट वादळ आणि वाऱ्याचा सामना करावा लागला होता. नैसर्गिक घटनेमुळे सेट उद्धवस्थ देखील झाला. यामुळे निर्मात्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. अशातच आता ज्युनिअर आर्टिस्टच्या निधनामुळे खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांतारा २ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचे सांगितले जात होते. तशा बातम्या देखील माध्यमांत येत होत्या. मात्र, यावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाला विलंब होणार नसून २ अॅाक्टोबर २०२५ रोजी कांतारा २ चित्रपटगृहात रिलीज करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
कांतारा हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट आहे. जरी त्याला त्याच्या मूळ भाषेत उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी, नंतर निर्मात्यांनी तो हिंदीसह अनेक भाषांमध्ये डब करून प्रदर्शित केला. ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०९ कोटी रुपयांची भरगच्च कमाई केली आहे. आता कांतारा २ चित्रपटाचा वेध प्रेक्षकांना लागला आहे.




