Old Pune-Mumbai highway: मुख्य मार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा; १० मिनिटांच्या अंतरासाठी दीड तास
मोरवाडी ग्रेड सेपरेटरमधील कामामुळे अनेक वाहनचालक अडकले कोंडीत

पिंपरी – दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडलेल्या शहरवासीयांना शनिवारी पिंपरीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटरमधील धोकादायक बनलेला सिमेंट प्लास्टरचा भाग हटवण्यासाठी महापालिकेने अवघी १५ मिनिटे सांगितली असताना प्रत्यक्षात तब्बल एक तासाहून अधिक काळ रस्ता अडवून ठेवण्यात आला.
त्यामुळे ग्रेड सेपरेटर बंद करून वाहतूक अचानक सर्व्हिस रस्त्यावर वळवण्यात आली. परिणामी अवघ्या १० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना तब्बल दीड-दोन तास अडकून पडावे लागले.
मोरवाडी येथील भुयारी मार्गात (ग्रेड सेपरेटर) मर्यादेपेक्षा अधिक उंची असलेले कंटेनर वारंवार धडकल्याने छतावरील सिमेंटचे प्लास्टर अत्यंत धोकादायक स्थितीत आले होते. हा भाग अचानक कोसळून एखादा मोठा व जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी पिंपरी वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाला तत्काळ पाचारण करून हा धोकादायक भाग काढून घेण्यास सांगितले.
मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ १५ मिनिटांत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कामासाठी एक तासाहून अधिक वेळ लावला. अचानक आणि पूर्वसूचना न देता हाती घेतलेल्या या कामामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला.
दिवाळी खरेदीच्या गर्दीत वाहनांच्या लांबच लांब रांगा
दिवाळी सण अगदी उंबरठ्यावर असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठा, मॉल्स आणि दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्गावरही अनेक मॉल व कपड्यांची शोरूम आहेत.
अशा ऐन गर्दीच्या वेळी मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक पूर्णपणे रोखून धरण्यात आल्याने ग्रेड सेपरेटरमधील वाहने सर्व्हिस रोडवर वळवावी लागली. आधीच गर्दी असलेल्या सर्व्हिस रोडवर वाहनांचा प्रचंड ताण वाढल्याने अवघ्या काही मिनिटांत निगडीपासून ते थेट मोरवाडी, पिंपरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहनांची प्रचंड गर्दी उसळली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ’की’ज हॉटेल चौकातून काही वाहने पर्यायी अंतर्गत मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्य महामार्गावरच वाहनांची इतकी प्रचंड कोंडी झाली होती की पर्यायी मार्गांवरही वाहनांच्या रांगा वाढतच होत्या.
दुचाकी, चारचाकी, पीएमपीएमएल बसेस यांच्यासह रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्याचे भीषण चित्र पाहायला मिळाले. अवघे चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अक्षरशः घाम फुटला आणि सुमारे दीड ते पावणेदोन तास हॉर्न वाजवत एकाच जागेवर उभे राहावे लागले.
पदपथावरून दुचाकी दामटल्या
वाहतूक कोंडीतून पुढे जाण्यासाठी काही दुचाकीस्वारांनी थेट पदपथावरून वाहने दामटली. यामुळे पदपथावरून जाणा-या पादचा-यांना जीव मुठीत धरून चालावे लागत होते. काही ठिकाणी पादचारी आणि दुचाकीस्वार यांच्या खटकेही उडत होते.
नागरिकांमधून तीव्र संताप
सणाच्या काळात प्रशासन अधिक सजग राहणे गरजेचे असताना, ऐन वर्दळीच्या वेळी अशी कामे काढण्याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हे दुरुस्तीचे काम रात्रीच्या वेळी किंवा वाहतुकीचा ताण कमी असताना करणे सहज शक्य होते, असे मत वाहनचालकांनी व्यक्त केले.
अचानक वाहतूक रोखल्यामुळे नोकरदार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांसह खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले.
वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण
पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अमित डोळस यांनी सांगितले की, ग्रेड सेपरेटरमधील सिमेंटचा भाग अत्यंत धोकादायक झाला होता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो तातडीने काढणे अत्यावश्यक होते. महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यासाठी अवघी १५ मिनिटे लागतील असे सांगितले होते.
मात्र, प्रत्यक्ष कामाला एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. काम अचानक निघाल्यामुळे वाहनचालकांना आधीच पूर्वसूचना देणे शक्य झाले नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक सर्व्हिस रोडने वळवून आणि काही ठिकाणी डायव्हर्शन देऊन कोंडी फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
Gift Hamper Trend : मिठाईच्या बॉक्सऐवजी ‘गिफ्ट हॅम्पर्स’चा ट्रेंड





