Donald Trump : ट्रम्प यांच्यामुळे व्यापार युद्धाला प्रारंभ; चीन, कॅनडा, मेक्सिकोकडून हालचाली सुरू

बीजिंग – अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून चीन, मेक्सिको आणि कॅनडावर आजपासून लागू झालेल्या वाढीव आयात शुल्काला या देशांनी जोरदार प्रतिकार सुरू केला आहे. या आयात शुल्काला आपला ठाम विरोध असून आपल्या हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यासाठी या आयात शुल्काविरोधातल्या उपाययोजना केल्या जातील, असे चीनने म्हटले आहे. ‘ट्रम्प यांच्या आदेशांविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे एक कायदेशीर खटला दाखल केला जाईल, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेने चीनी उत्पादनांवर लादलेल्या वाढीव आयात शुल्कावरून चीन निश्चितच नाराज आहे, असेही चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर १० टक्के आयात शुल्क लावण्याच्या आदेशांची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू होईल, असे ट्रम्प म्हणाले होते.
त्याच प्रमाणे कॅनडा आणि मेक्सिकोवरील २५ टक्के आयात शुल्काचीही अंमलबजावणी सुरू होत असल्याचेही ते म्हणाले होते. या देशांमधून बेकायदेशीर शरणार्थी आणि फेंटॅनाईल या अमली पदार्थांना अमेरिकेत आणले जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
ट्रम्प यांच्या आदेशांप्रमाणेच मेक्सिकोकडूनही प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेवर आयात शुल्क लावले जाईल, असे मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम पार्डो यांनी म्हटले आहे. मेकिस्को सरकारचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा ट्रम्प यांचा दावाही त्यांनी फेटाळला आहे. उलट मेक्सिकोतील गुन्हेगारी टोळ्यांना अमेरिकेतूनच विक्री केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमेरिकेला वाटणाऱ्या चिंतेच्या मुद्यावरून दोन्ही देशांमधील आरोग्य आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा एक कृती गट करण्याचा प्रस्तावही त्यांनी सुचवला आहे. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला अमरिकेकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
कॅनडाने देखील लावले अमेरिकेवर आयात शुल्क…
ट्रम्प यांच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही अमेरिकेतल्या उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम तब्बल १५५ अब्ज डॉलर इतकी असणार आहे.
यातील ३० अब्ज डॉलर रकमेच्या आयात शुल्काला मंगळवारपासून सुरुवात होईल. तर उर्वरित १२५ अब्ज डॉलर रकमेच्या आयात शुल्काची आकारणी पुढील २१ दिवसात सुरू केली जाईल, असेही ट्रुडो यांनी म्हटले आहे.





