Pune District | ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर, बैलगाडी रिफ्लेक्टर बसवावेत

लाखणगाव, -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर व बैलगाडीस परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्याने पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक बसली. त्यामुळे मागील आठवड्यात तीन ते चार अपघात अशा प्रकारे झाले आहे. त्यामुळे भीमाशंकर आणि विघ्नहर साखर कारखान्याने ऊस वाहतूक करणार्या वाहनांना तातडीने परावर्तक लावावे, अशी मागणी काठापुर बुद्रुक व पोंदेवाडी ग्रामस्थ व प्रवाशांकडून केली जात आहे.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा आणि शिरोली (ता. जुन्नर) येथील विघ्नहर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे-जेजुरी महामार्ग तसेच रांजणगाव-ओझर अष्टविनायक महामार्ग या दोन्ही महामार्गावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अनेक वाहनांना पाठीमागील बाजूस परावर्तक बसवले नसल्याने रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्यामागून आलेल्या वाहनचालकांना समोर असनारे उसाने भरलेली वाहने दिसत नाही. विशेष करून पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वार या वाहनांना धडकतात. मागील आठवड्यात तीन ते चार अपघाताच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे विघ्नहर आणि भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस वाहतूक करणार्या वाहनांना तातडीने परावर्तक लावावे. अशी मागणी पोंदेवाडी व काठापूर ग्रामस्थांनी केली आहे.





