पुणे जिल्ह्यात भात चिखलणीसाठी ट्रॅक्टरला पसंती

पारंपरिक बैलाचे औत मिळेना ; मजुरांचा तुटवडा असल्याचा परिणाम
हिरडस मावळ : भोर तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या पावसाच्या भागात सध्या शेतकरी भात लावणीत गुंतले असून, सध्या भात लावणीची लगबग दिसून येत आहे. सगळीकडेच लावणी चालू असल्याने मजुरांचा तुटवडा आहेच; परंतू भात लावणीसाठी चिखल करायला आवश्यक असणारे बैलांचे पारंपरिक औतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आता यांत्रिकीकरणाकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.
भोरच्या पश्चिम भागात पावसावर पिकणाऱ्या भाताचे एकमेव पीक घेतले जाते. पूर्वीपासून मशागतीसाठी बैलांचा वापर केला जात असे. भात शेतीच्या कामासाठी बैलाचा वापर झाला की वर्षभर बैल जोडीला शेतकऱ्याला पोसावे लागत असते.
बैलाला संभाळणे सध्याच्या काळात शेतकऱ्याला खर्चिक वाटू लागल्याने बैल पाळणे शेतकऱ्यांनी कमी केले असून, पर्यायाने शेती कामाच्या मशागतीसाठी बैलाचा तुटवडा भासू लागला. पर्यायाने शेतकरी यंत्रांचा (ट्रॅक्टर) वापर करू लागला. कमी वेळेत व खर्चात जास्त काम होत असल्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला पसंती वाढत आहे. पूर्वी भात शेतीसाठी चिखल करायला दोन-दोन दिवस लागायचे; पण आता दोन तासांत होत आहे.
भोर तालुक्याच्या पश्चिम भाग असलेल्या डोंगराळ नीरा देवघर धरण क्षेत्रात शेतकऱ्यांनी औतासाठी बैल पाळण्याचे प्रमाण घटले आहे. हा भाग डोंगराळ असल्याने काही अडचणीच्या ठिकाणी टॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी अथवा स्वतःची बैलजोडी आहे तसेच ज्यांना रोजाने औत उपलब्ध होत आहे असेच शेतकरी बैलाच्या औताचा वापर करीत आहेत.
ट्रॅक्टरला तेराशे रुपये खर्च
बैल पाळण्याचा खर्च परवडत नाही व बैलाचे औत शेतात घेऊन जायचे तर औताचा खर्च दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने तेही परवडत नाही. भात लावणीसाठी ट्रॅक्टरला रोटर बसवून चिखल केला तर त्याचा खर्च हजार ते तेराशे रुपयांदरम्यान देऊन काम दोन तासांत पूर्ण होताना दिसत आहे.
कृषी विभागाकडून अनुदान
कृषी विभागाकडून शेती अवजारे खरेदीत शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे, त्यामुळेही शेतकरी अवजारे खरेदी करू लागला आहे. सहाजिकच त्याचा परिणाम बैलजोडी पाळण्यावर झाला आहे.
पूर्वी घरोघरी बैल जोडी असायची; परंतु आता बैल पाळणारे मोजकेच आहेत, त्यामुळे भात लावणीत किंवा शेताच्या मशागतीसाठी औत वेळेवर मिळेनासे झाले असल्यामुळे शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला आहे.
– गणपत धामुनसे, शेतकरी, हिर्डोशी





