Hingoli Accident : मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; ८ जणांचा मृत्यू, गुंज गावावर पसरली शोककळा

हिंगोली : हिंगोलीतून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (दि. ०४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात घडली आहे. या अपघातात १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या. त्यावेळी ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. २ महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ८ जण विहिरीमध्ये बुडाले असून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महसुल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि. नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला.
यातील २ महिला आणि एक पुरुष है सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत आहे. विहीरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




