Hridoy Triple Century : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! ३५० धावांची नाबाद खेळी करूनही कर्णधाराने घेतला अजब निर्णय
Hridoy Triple Century : तौहीद हृदोय परदेशात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा तो बांगलादेशचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Towhid Hridoy Triple Century 350 Runs Bangladesh A vs South Africa A First Class Record : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश ‘ए’ संघाचा युवा कर्णधार तौहीद हृदोयने (Towhid Hridoy) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्ध सेनवेस पार्कवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात तौहीदने तब्बल ३५० धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने ४५० चेंडूंत आपले तिहेरी शतक पूर्ण केले. परदेशात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा तो बांगलादेशचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
परदेशी भूमीवर असा कारनामा करणारा पहिला फलंदाज; तमीम इक्बालचा मोडला विक्रम –
तौहीद हृदोय हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा बांगलादेशचा अवघा तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी रकीबुल हसनने २००७ मध्ये ३१३ धावा आणि तमीम इक्बालने २०२० मध्ये ३३४ धावांची खेळी केली होती; मात्र त्या दोघांनी हा पराक्रम मायदेशात केला होता. तौहीदने ३५० धावा कुटून प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आपल्या नावावर नोंदवली आहे.
४०० धावा करण्याची संधी होती, पण कर्णधाराने स्वतःच घोषित केला डाव –
300 UP!!!
What an immense innings from Towhid Hridoy!!
1st Bangladeshi to smash 300 vs an SA side!
And it was FLAWLESS!!@BCBtigers @ProteasMenCSA https://t.co/hCQuakXI7H pic.twitter.com/kihlsHtzhG
— Bhubesi🦁👑 (@MpenduloTweets) September 2, 2026
कर्णधार तौहीद हृदोयने ४८१ चेंडूंचा सामना करताना २७ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ३५० धावांची खेळी केली. त्याच्याकडे वैयक्तिक ४०० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी होती; मात्र वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाच्या रणनीतीला प्राधान्य देत त्याने ३५० धावांवर असतानाच डाव घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याच्या या निःस्वार्थी निर्णयाचे क्रिकेट जगतात प्रचंड कौतुक होत आहे.
आफ्रिकेच्या ५१२ धावांना ८ बाद ६७६ धावांनी चोख प्रत्युत्तर –
दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाने पहिल्या डावात ५१२ धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेश ‘ए’ ने ८ बाद ६७६ धावांवर पहिला डाव घोषित केला. कर्णधार तौहीद व्यतिरिक्त यष्टिरक्षक झाकेर अलीने ९४ आणि मोहम्मद सैफुद्दीनने ८७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. पहिल्या सामन्यात डावाने पराभव पत्करावा लागल्यानंतर बांगलादेशने तौहीदच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर दमदार पुनरागमन केले आहे.





