Pune District | पर्यटनाला चालना मिळणार – खासदार डॉ. कोल्हे

नारायणगाव : ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणार्या भक्ती-शक्ती कॉरिडॉरची उभारणी व्हावी, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली होती. त्याला केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निधी मंजूर केला. दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर पर्यटनाला चालना मिळणार असून दुर्गम आदिवासी भागातील रस्ते, वाहतूक दळणवळण यंत्रणा सक्षम होऊन विकासाचा मार्ग मोकळा होईल. दोन मार्गिकांचे रूंदीकरण, पुनर्बांधणी व अपग्रेडींगचे काम होणार असून या भागातील जनतेसाठी चांगले रस्ते तयार होणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणार्या बनकरफाटा, जुन्नर, घोडेगाव ते तळेघर आणि तळेघर, भीमाशंकर, वाडा, चास ते राजगुरुनगर भक्ती-शक्ती मार्गाला मंजुरी देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरील दोन्ही रस्त्यांना महामार्गाचा दर्जा दिला होता. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याची व्यवहार्यता तपासणी व सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता.
भक्ती शक्ती रस्ता झाल्यास शिरूर लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जोडली जाणार असून पर्यटनाला चालना मिळेल यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.





