Bhimrao Kamble : “तूचं सांग तुला काय शिक्षा मिळावी”; न्यायाधीशांचा प्रश्न, नराधमाचं उत्तर ऐकून सगळेच हैराण, नेमकं काय घडलं?
Bhimrao Kamble : या अत्यंत घृणास्पद घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

Bhimrao Kamble : नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली होती.
या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राचे उमटल्याचे बघायला मिळाले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याची महत्वपूर्ण सुनावणी आज होत आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांच्यासमोर पार पडत आहे. या अत्यंत घृणास्पद घटनेनंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
कोर्टात काय घडलं? (Bhimrao Kamble)
कोर्टात या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले. यावेळी शिक्षेसाठी युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला काही सवाल केले. न्यायाधीशांनी या प्रकरणात आरोपीलाच विचारलं की, तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी? मात्र, आरोपीने न्यायालयात सुनावणीवेळी बनाव रचला. त्याचा बनाव कोर्टातच उघड झाला आणि त्याला कोर्टाने दोषी ठरवले.
हेही वाचा : Monsoon Care: पावसाळ्यात केस आणि त्वचा होतात चिकट? या सोप्या उपायांनी ठेवा दोन्ही निरोगी
न्यायाधीश प्रचंड संतापले (Bhimrao Kamble)
कोर्टाने सांगितलं की,”तुझ्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी?” यावर नराधम म्हणाला “मी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो. मी तिला मारलेलं नाही. मी तिला घेऊन जात असताना अचानक माझा पाय घसरला आणि आम्ही दोघेही खाली पडलो. त्यातच तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तिचा मृत्यू झाला.” असं उत्तर त्याने दिलं. आरोपीचा हा खोटा दावा ऐकल्यानंतर न्यायाधीश प्रचंड संतापले.
फाशीच्या शिक्षेची मागणी
पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार तसेच DNA अहवालावरुन आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्याला म्हटले, “प्रथम तू काय कृत्य केलं आहेस त्याची आठवण कर आणि मग काय ते सांग” तसेच तुझ्याविरोधात सर्व गंभीर गुन्हे आणि पुरावे सिद्ध झाल्याचे न्यायाधीशांनी सांगितलं. सरकारी पक्षाने आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भीमराव कांबळे याला अटक केली. त्यानंतर त्याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा केले. या खटल्यात सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
२९ जूनला निकाल दिला जाणार
या प्रकरणाचा अंतिम निकाल कोर्टाने राखून ठेवला असून येत्या सोमवारी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आहे. यावेळी मुलीच्या वडिलांनी कोर्टासमोर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे २९ जूनला आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे कोर्ट नराधमाला कोणती शिक्षा सुनावणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.






