Nora Fatehi : ‘त्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं ते भयावह होतं’; नोरा फतेहीचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं होतं?
Nora Fatehi : या प्रकरणानंतर आजही एखाद्या कार्यक्रमासाठी जाताना मनात भीती निर्माण होते, असे तिने सांगितले.

Nora Fatehi : बॅालिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचा तिच्या मानसिक स्थितीवर आणि करिअरवर मोठा परिणाम झाला असल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान नोराचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत जोडले गेले होते. या प्रकरणामुळे आपल्याला मोठा मानसिक धक्का बसल्याचे नोराने सांगितले. ‘ड्रीम विथ डॉ. शीन’ या पॉडकास्टमध्ये नोराने या काळातील अनुभवांविषयी मोकळेपणाने भाष्य केले.
या प्रकरणानंतर आजही एखाद्या कार्यक्रमासाठी जाताना मनात भीती निर्माण होते, असे तिने सांगितले. तिच्या मते, या प्रकरणामुळे तिच्याबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी पसरल्या गेल्या आणि त्याचा थेट परिणाम तिच्या कामावर झाला.
नोराने सांगितले की, या काळात तिने अनेक ब्रँड्स आणि कामाच्या संधी गमावल्या. तिच्याबद्दल निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे करिअरला मोठा फटका बसला. आजही काही लोक तिला सुकेश चंद्रशेखरला ओळखते का किंवा त्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते का, असे प्रश्न विचारतात, असे ती म्हणाली.
‘लोकांनी माझ्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार केली’
सुकेशसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज निर्माण झाल्याने आपल्याला सर्वाधिक दुःख झाले, असे नोराने सांगितले. ती म्हणाली की, काही कार्यक्रमांमध्ये सुकेशच्या कुटुंबीयांसह इतर लोकांची भेट झाली होती. त्या वेळी मिळालेल्या भेटवस्तू आणि कारबाबतही तिने भाष्य केले. मात्र, या घटनांना वेगळा अर्थ देण्यात आल्याचे आरोप नोराने केला आहे.
‘मला या परिस्थितीतून बाहेर पडायला कोणी मदत केली नाही’
या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी दरम्यानचा अनुभव आठवताना नोराने त्याचे वर्णन भयावह असे केले. ती म्हणाली “त्या काळात मला स्वतःबद्दल वाईट वाटत होतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणी मदत केली असती तर बरं झालं असतं. मला खूप एकटं आणि गोंधळल्यासारखं वाटत होतं,” अशी भावना नोराने व्यक्त केली. या प्रकरणामुळे आपल्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण झाली आणि आपण एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात असल्याचे चित्र रंगवले गेले, याचे तिला अधिक दुःख असल्याचे तिने सांगितले.
नेमकं प्रकरण काय आहे?
सुकेश चंद्रशेखर हे नाव २०० कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आले. या पैशांतून त्याने बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणीने ईडीने या दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली होती. सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुमध्ये राहणारा एक उद्योजक आहे. आजवर अनेकांची फसवणूक त्याने केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्याला अटक केली होती.






