Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाची भेट! लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात; पटापट चेक करा खाते
Ladki Bahin Yojana: रक्षाबंधननिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना विशेष भेट

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. रक्षाबंधननिमित्त महायुती सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना विशेष भेट देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यात आल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्यांच वितरण सुरु करण्यात आलं आहे. त्यानुसार काही पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असून, पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट : जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील… pic.twitter.com/bO7pSPkF8a
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 25, 2026
मंत्री आदिती तटकरे यांचे ट्विट
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले की, “लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट- जुलै महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.”
पुढे त्यांनी लिहिले की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.”
लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 65 लाख
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 47 लाख इतकी होती. यानंतर राज्य सरकारकडून ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यानं 62 लाख महिलांची नावं वगळण्यात आली.
याशिवाय इतर कारणांमुळं देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ई केवायसी पूर्ण केल्यानंतरच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 65 लाख इतकी आहे. आतापर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 92 लाखांनी घटली आहे.
३००० नाही तर केवळ १५०० जमा
दरम्यान, ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये मिळणार की केवळ एकाच महिन्याचा हप्ता जमा होणार, याबाबत चर्चा होती. मात्र, सरकारने सध्या वितरित करण्यात येत असलेला हप्ता हा केवळ जुलै महिन्याचा १५०० रुपये असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे.
हेही वाचा :
Pune News : नेत्रदान जनजागृतीसाठी चळवळ उभारणे ही काळाची गरज : डॉ अनिल दुधभाते





