Virat Kohli Record : ३५ शी ओलांडली तरी ‘किंग’चा रुबाब कायम! सचिन तेंडुलकरला मागे टाकत विराटने IPL मध्ये रचला नवा इतिहास
Virat Kohli Record : या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

Virat Kohli Break Sachin Tendulkar Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ६१ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमनेसामने आले आहेत. या सामन्यात टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली याने मैदानात उतरताच पुन्हा एकदा विक्रमांचा पाऊस पाडला आहे. पंजाबविरुद्धच्या डावात १६ वी धाव पूर्ण करताच विराटने चालू हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यात ५८ धावांची शानदार खेळी करून तो बाद झाला, पण तत्पूर्वी त्याने सचिन तेंडुलकरसह फाफ डु प्लेसिसचा एक खास विक्रम मोडला.
विराटने सचिन-प्लेसिसला टाकलं मागे –
विराट कोहलीने वयाच्या ३५ वर्षानंतरही खोऱ्याने धावा काढत सर्वांना चकित केले आहे. आयपीएलच्या इतिहासात ३५ किंवा त्याहून अधिक वय असताना एकाच हंगामात सर्वाधिक वेळा ५०० हून अधिक धावा करण्याचा महाविक्रम आता कोहलीच्या नावावर झाला आहे. विराटने तब्बल तिसऱ्यांदा हा कारनामा करत महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि फाफ डु प्लेसिस यांना मागे टाकले आहे. सचिन आणि डु प्लेसिस यांनी वयाच्या ३५ शी नंतर प्रत्येकी २-२ वेळा अशी कामगिरी केली होती. विराटने २०२४ मध्ये ७४१ धावा, २०२५ मध्ये ६५७ धावा केल्या होत्या; तर यंदा २०२६ च्या हंगामात १३ सामन्यांत ५४.२ च्या सरासरीने २ शतके आणि ४ अर्धशतकांसह ५४२ धावा कुटल्या आहेत.
आयपीएल इतिहासात ९ व्यांदा ५०० हून अधिक धावा –
Virat Kohli scored 500+ runs 9 times 👑🔥🏏
Follow @InfuseInformer#PBKSvsRCB #RCBvsPBKS #ViratKohli pic.twitter.com/8ToshC3OKh
— InfuseInformer (@InfuseInformer) May 17, 2026
आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक वेळा ५०० किंवा त्याहून अधिक धावा बनवण्याचा विक्रम कोहलीने आधीच आपल्याकडे राखला होता. आता ९ व्यांदा ही कामगिरी करत त्याने स्वतःचाच विक्रम आणखी मजबूत केला आहे. या यादीत केएल राहुल आणि डेव्हिड वॉर्नर संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी ७-७ वेळा हा टप्पा गाठला आहे, तर शिखर धवन ५ वेळा ५००+ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
अॅलेक्स हेल्सच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी –
याच सामन्यात विराटने देवदत्त पडिक्कल आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी रचली. या भागीदारीसह जागतिक टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ‘५० प्लस’ धावांच्या भागीदारीचा हिस्सा बनण्याच्या बाबतीत विराटने इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता या दोघांच्या नावावर पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी २१० वेळा फिफ्टी प्लस भागीदारीचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.





