PBKS vs RCB : पंजाबविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात आरसीबीने अचानक कर्णधार का बदलला? नेमकं कारण काय?
PBKS vs RCB : नाणेफेकीच्या वेळी आरसीबीचा नियमित कर्णधार रजत पाटीदारच्या जागी जितेश शर्मा आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

RCB’s regular skipper Rajat Patidar misses out due to injury : आयपीएल २०२६ च्या ६१ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक (टॉस) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, नाणेफेकीच्या वेळी आरसीबीचा नियमित कर्णधार रजत पाटीदारच्या जागी जितेश शर्मा आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
आरसीबीचा नियमित कर्णधार का बाहेर?
दुसरीकडे, आरसीबीला या सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा नियमित कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करत आहे. पाटीदारच्या अनुपस्थितीत सुयशला संघात संधी मिळाली आहे, तर जेकब डफीच्या जागी रोमारियो शेफर्डची संघात वापसी झाली आहे. कार्यवाहू कर्णधार जितेशने सांगितले की, पाटीदार वेगाने बरा होत असून तो पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावर; विराटच्या फॉर्मकडे लक्ष
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL have won the toss and elected to bowl first against @RCBTweets
Jitesh Sharma is leading #RCB in absence of the injured Rajat Patidar.
Updates ▶️ https://t.co/3u5qL0Zn75#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRCB pic.twitter.com/zBp1WIbxbj
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
आरसीबीचा संघ प्लेऑफचे तिकीट मिळवण्यापासून अवघा एक विजय दूर आहे. आरसीबीने आपल्या शेवटच्या सामन्यात केकेआरचा पराभव केला होता. त्या सामन्यात विराट कोहलीने ६० चेंडूंत नाबाद १०५ धावांची खेळी करत एकहाती विजय मिळवून दिला होता. विराटसोबतच देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्मात आहे, तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने या हंगामात आतापर्यंत २२ विकेट्स घेत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आरसीबी आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी उत्सुक आहे.
पंजाबच्या संघात दोन मोठे बदल; श्रेयस अय्यरचं ‘शतक’
श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून हा १०० वा आयपीएल सामना आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पंजाबला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य आहे. टॉस जिंकल्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “मला माहित नव्हते की कर्णधार म्हणून हा माझा १०० वा सामना आहे, पण आज संघ जिंकला तर मला अधिक आनंद होईल.”
पंजाबने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले असून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि फिरकीपटू हरप्रीत बरार यांचे संघात पुनरागमन झाले आहे. पंजाबला गेल्या पाच सामन्यांत सलग पराभव स्वीकारावा लागला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे.





