Vinesh Phogat Reveals : ‘त्या सहा पीडितांपैकी मी एक…’, विनेश फोगाटच्या खुलाशानंतर कुस्ती विश्वात मोठा भूकंप, पाहा VIDEO
Vinesh Phogat Reveals : विनेश फोगाटने आगामी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणीच्या ठिकाणावर कडाडून आक्षेप घेतला आहे.

Vinesh Phogat reveals herself as a complainant : भारतीय कुस्ती जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या हे मान्य केले आहे की, त्या भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या ६ महिला खेळाडूंपैकी एक आहेत. तिच्या या खळबळजनक खुलाशाने क्रीडा क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
ओळख उघड करण्याचे कारण –
रविवारी (३ मे २०२६) जारी केलेल्या एका व्हिडिओत भावुक होत विनेश फोगाटने सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तिने आतापर्यंत आपली ओळख गुप्त ठेवली होती. मात्र, कुस्तीमधील सध्याची परिस्थिती आणि तिच्या पुनरागमनाच्या मार्गात जाणीवपूर्वक निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणींमुळे तिला अखेर आपले मौन सोडण्यास भाग पडले.
🇮🇳🙏 pic.twitter.com/hQrGmMLMrS
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 3, 2026
निवड चाचणीवर गंभीर आक्षेप –
विनेश फोगाटने आगामी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणीच्या ठिकाणावर कडाडून आक्षेप घेतला आहे. या चाचण्या जाणीवपूर्वक उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित केल्या जात असल्याचा आरोप तिने केला आहे. गोंडा हा बृजभूषण शरण सिंहचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे एका खाजगी महाविद्यालयात ही स्पर्धा होत असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा वातावरणात कोणतीही पीडित खेळाडू निर्भयपणे खेळू शकणार नाही, अशी चिंता तिने व्यक्त केली आहे.
महासंघावर आजही दबदबा –
विनेशने सध्याच्या कुस्ती महासंघाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बृजभूषण हा आता कोणत्याही पदावर नसला तरी, महासंघावर त्याचा प्रभाव अजूनही कायम असल्याचा दावा तिने केला आहे. पंचांची नियुक्ती असो किंवा गुणांची विभागणी, प्रत्येक प्रक्रियेवर त्याच्याच जवळच्या लोकांचे नियंत्रण असल्यामुळे खेळाडूंवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.
१८ महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात –
हा संपूर्ण वाद २०२३ मध्ये सुरू झाला होता, जेव्हा विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी जंतर-मंतरवर दीर्घ आंदोलन केले होते. आता सुमारे १८ महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर विनेश पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिची ही लढाई केवळ खेळापुरती मर्यादित न राहता न्यायाच्या दिशेनेही एका निर्णायक वळणावर आली आहे.





