Ramkrishna Ghosh Injury : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, नेमकं कारण काय?
Ramkrishna Ghosh Injury : २८ वर्षीय रामकृष्ण घोष हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

Ramkrishna Ghosh ruled out IPL 2026 after Injury : आयपीएल २०२६ च्या हंगामात पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्सच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संघाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, त्याचा युवा आणि उगवता अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोष दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघ व्यवस्थापनाने याबाबतचे अधिकृत निवेदन नुकतेच जारी केले आहे.
नेमकं काय घडलं?
२ मे रोजी चेपॉकच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रामकृष्ण घोषला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. या गंभीर दुखापतीमुळे तो आता आयपीएल २०२६ मधील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
OFFICIAL ANNOUNCEMENT:
Ramakrishna Ghosh sustained a fracture to his right foot during the CSK v MI match at Chepauk.
He will take no further part in IPL 2026.
Get well soon, Rambo. pic.twitter.com/CQve4zLixG— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 3, 2026
अल्पायुषी ठरलेले पदार्पण –
२८ वर्षीय रामकृष्ण घोष हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने त्याला २०२५ च्या लिलावात आपल्या ताफ्यात सामील केले होते आणि २०२६ च्या मोसमासाठी संघात कायम (रिटेन) ठेवले होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातूनच त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाल्याने त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न सध्या अपूर्ण राहिले आहे.
🚨 OFFICIAL 🚨
CSK confirms that Ramkrishna Ghosh will no longer take part in the IPL 2026 due to fracture in his right foot ❌ @ChennaiIPL #RamkrishnaGhosh #IPL2026 #CSK pic.twitter.com/tu2d9QNSHj
— the_cricket_web (@the_cricket_web) May 3, 2026
रामकृष्ण घोषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ९.४ षटकांत केवळ ४२ धावा देत ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय, मुंबईविरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूंत ६४ धावांची धडाकेबाज खेळी करत त्याने आपण आक्रमक फलंदाज असल्याचेही दाखवून दिले होते. त्याच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई संघाचा समतोल ढासळण्याची शक्यता आहे.
सीएसके संघाला दुखापतींचा फटका-
चेन्नई सुपर किंग्ससाठी हा हंगाम दुखापतींच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी ठरला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाज नॅथन एलिस संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. त्यानंतर खलील अहमद आणि आक्रमक फलंदाज आयुष म्हात्रे यांनाही दुखापतीमुळे संघाची साथ सोडावी लागली. त्यातच आता रामकृष्ण घोष यांच्या रूपाने संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.





