Sourav Ganguly Hall Fame : ‘१४ वर्षांचे असतानापासून…’, गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर सचिनच्या पोस्टने वेधलं लक्ष
Sourav Ganguly Hall Fame : भारताचे माजी कर्णधार आणि 'दादा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुली यांना त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त 'आयसीसी हॉल ऑफ फेम' या अत्यंत प्रतिष्ठेच्या यादीत सामील करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Sourav Ganguly ICC Hall Of Fame 2026 Sachin Tendulkar Birthday Wish : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दोन सर्वात दिग्गज आणि लोकप्रिय नावे, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली सध्या सोशल मीडियावर एका अत्यंत भावुक प्रसंगामुळे चर्चेत आले आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुली यांना त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या यादीत सामील करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
११ जुलै रोजी त्यांना अधिकृतपणे या सन्मानाने गौरवले जाईल. या ऐतिहासिक यशानंतर सचिन तेंडुलकरने आपल्या जुन्या मित्रासाठी लिहिलेला संदेश आणि त्यावर गांगुलीने दिलेले उत्तर सध्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मने जिंकत आहे.
हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे १२ वे भारतीय –
या बहुमानासह सौरव गांगुली आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे १२ वे भारतीय क्रिकेटर बनणार आहेत. यापूर्वी सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या दिग्गजांना हा बहुमान मिळाला आहे. आतापर्यंत या प्रतिष्ठित यादीत जगातील एकूण १२२ क्रिकेटपटूंचा (१०७ पुरुष आणि १५ महिला) समावेश करण्यात आला आहे.
“१४ वर्षांचे असतानापासून…” सचिनची भावुक पोस्ट –
There aren’t too many surprises left after knowing each other since we were 14. This wasn’t one either.
Congratulations @SGanguly99. So happy to see you in the @ICC Hall of Fame! https://t.co/gGFogVBoqD
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 9, 2026
गांगुलीच्या या सन्मानाची घोषणा होताच सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक भावनिक पोस्ट शेअर केली. सचिनने लिहिले, “आपण एकमेकांना वयाच्या १४ व्या वर्षापासून ओळखतो, त्यामुळे आता फार कमी गोष्टी आपल्याला थक्क करू शकतात. तुझा हा सन्मानही त्यापैकी एक नाही (कारण तू यास पूर्ण पात्र आहेस). सौरव गांगुली, तुझे खूप खूप अभिनंदन! तुला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये पाहताना मला प्रचंड आनंद होत आहे.”
सचिनच्या प्रतिक्रियेवर ‘दादा’चे उत्तर ठरले खास –
Thank you champion .. to be in the same list as you is the biggest job satisfaction ever @bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) July 9, 2026
सचिनच्या या सुंदर संदेशाला उत्तर देताना सौरव गांगुलीने लिहिले, “धन्यवाद, चॅम्पियन! ज्या यादीत तुझे नाव आहे, त्याच यादीत तुझ्यासोबत सामील होणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद, समाधान आणि सन्मान आहे.” दोन्ही दिग्गजांमधील हा संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून फॅन्स याला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मैत्रीचे उदाहरण सांगत आहेत. सौरव गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटीत ७,२१२ धावा आणि ३११ एकदिवसीय सामन्यांत ११,३६३ धावा केल्या असून त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ शतके आहेत.





