Dussehra 2026: विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात आज 6 मेळावे; राजकीय आरोप-प्रत्योरापांच्या तोफा धडाडणार
Dussehra 2026: कोणाचे कुठे दसरा मेळावा?

Dussehra 2026: विजयादशमीच्या मुहूर्तावर आज मंगळवारी महाराष्ट्रात एकूण सहा मेळावे पार पडणार आहेत. मुंबईत उद्धवसेना आणि शिंदेसेना यांचे मेळावे होणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांचे मेळावे वेगवेगळ्या व्यासपीठावर होत आहेत. या मेळाव्यातून दोन्ही शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे VS उद्धव ठाकरे
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देऊ शकतात. तसेच महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडण्याची शक्यता आहे. राज्यात तीव्र दुष्काळ असल्याने दसरा मेळाव्याला मुंबईत येण्याऐवजी दुष्काळग्रस्तांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
तर उद्धवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. उद्धव ठाकरेंकडून भाजप, एसआयआर, मतदार यादीतील कथित अनियमितता, टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारावरून कायदा-सुव्यवस्था, पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली दडपशाही या मुद्द्यावरून ते राज्य व केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे, नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील तर आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गड येथे भाजप आमदार सुरेश धस यांचे मेळावे होत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पारंपारिक दसरा मेळावा बीडच्या श्री क्षेत्र नारायण गडावर शेकडो एकरवर होणार आहे. यंदाचा त्यांचा हा तिसरा मेळावा आहे. यानिमित्त जरांगे आज काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा मेळावा
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर होत आहे. बीडच्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, मंत्री मेघना बोर्डीकर, महादेव जानकर, सुजय विखे, माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहे.
आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मेळाव्याचे अठरावे वर्ष असून, आमदार सुरेश धस यांच्यासह विविध संत-महंतांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
आरएसएसचा विजयादशमी मेळावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चा विजयादशमी मेळावा नागपूरच्या रेशीमबाग परिसरात उत्साहात साजरा होत आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भावगत आणि ‘दैनिक जागरण’चे मुख्य संपादक संजय गुप्ता यांनी शस्त्रपूजन केले. आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि ‘दैनिक जागरण’चे मुख्य संपादक संजय गुप्ता यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार यांच्या पुतळ्याला आणि समाधीवर पुष्पांजली वाहिली. यावेळी अनेक भाजप नेते या सोहळ्यात उपस्थित झाले आहे.
हेही वाचा :






