Wrestling Controversy : पुण्याच्या आखाड्यात राडा! सिकंदर शेखवर समर्थकाचा हात उचलण्याचा प्रयत्न; ११ लाखांची कुस्ती वादात, पाहा VIDEO
Wrestling Controversy : 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यातील ११ लाखांच्या इनामी कुस्ती दरम्यान एका समर्थकाने थेट आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याने मैदानात एकच खळबळ उडाली.

Sikandar Shaikh vs Mauli Kokate wrestling controversy : कुस्तीच्या मैदानात जेव्हा दोन तगडे पैलवान एकमेकांशी भिडतात, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते, मात्र मुळशीतील पौड येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे यांच्यातील ११ लाखांच्या इनामी कुस्ती दरम्यान एका समर्थकाने थेट आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याने मैदानात एकच खळबळ उडाली.
नेमकं घडलं काय?
महाशिवरात्री उत्सवानिमित्त पौड येथे ‘मल्लिकार्जुन कुस्ती किताब’ स्पर्धेचे आयोजन १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेतील मुख्य आकर्षण होते सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे. आयोजकांनी ही कुस्ती ‘निकाली’च होणार असे जाहीर केल्याने दोन्ही पैलवान विजयासाठी जीव तोडून लढत होते. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही लढत तब्बल एक तास सुरू होती.
६० सेकंदांचा तो थरार आणि वाद –
तासभराच्या झुंजीत दोन्ही पैलवान थकले होते, मात्र चुरस कायम होती. कुस्ती दरम्यान माऊली कोकाटेने आक्रमक होत सिकंदरच्या मानेवर प्रहार (थपडा) मारण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सिकंदरचा संयम सुटला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
हा वाद सुरू असतानाच, आखाड्याच्या कडेला असलेल्या माऊली जमदाडेच्या एका समर्थकाने अचानक मैदानात धाव घेतली. काही समजण्याच्या आतच त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून मैदानात गोंधळ उडाला आणि प्रेक्षकांमधून संताप व्यक्त होऊ लागला.
गुरूंची मध्यस्थी आणि वादावर पडदा –
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सिकंदरचे गुरू विशाल हारगुले यांनी तातडीने आखाड्यात उडी घेतली. त्यांनी दोन्ही पैलवानांना शांत केले आणि वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शेवटी कुस्तीचा निकाल काय लागला?
भरपूर वेळ होऊनही आणि आखाड्यात झालेल्या राड्यामुळे कुस्ती निकाली होणे कठीण झाले होते. अखेर आयोजकांनी आणि पंचांनी वादावर पडदा टाकण्यासाठी मध्यममार्ग स्वीकारला. ही कुस्ती बरोबरीने (सोडवण्यात आली) घोषित करून दोन्ही पैलवानांना संयुक्त विजयी जाहीर करण्यात आले.






