Pune Ganeshotsav : श्री गणेशाय नम: || पुण्यातील मानाच्या ५ गणपतींची प्रतिष्ठापना कधी आणि कोणाच्या हस्ते होणार? जाणून घ्या वेळ…
Pune Ganeshotsav : दगडूशेठ गणपतीची 'मयूर रथा'तून श्रींची आगमन मिरवणूक तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसाठी 'श्रीगणेश सुवर्णधाम'

Pune Ganeshotsav : मानाचा पहिला – श्री कसबा गणपती
मानाचा पहिला असलेल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी उत्सव मंडपातून निघणार आहे. मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या रास्ता पेठेतील कलानिकेतन वास्तूमध्ये पोहोचून तेथे बाप्पांना पालखीत विराजमान करून ही मिरवणूक तेथून उत्सव मंडपाच्या दिशेने निघणार आहे.
या मिरवणुकीत प्रभात बँड, संघर्ष ढोल ताशा पथक, ज्ञानप्रबोधिनी युवक विभाग, शौर्य ढोलताशा पथक आदी सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक रास्ता पेठ पाॅवर हाउस, केईएम रुग्णालय, अपोलो थिएटर, दारूवाला पूल, देवजीबाबा चौक मार्गे कसबा गणपती मंदिराजवळ येईल. त्यानंतर ११ वाजून ४५ मिनिटांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
वाराणसी येथील सांगवेद विद्यापीठात अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केलेले १९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे
मानाचा दुसरा – श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मानाचा दुसरा असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून सकाळी ठीक १० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लाॅज येथून उत्सव मंडपाकडे निघणार आहे.
या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक सहभागी होणार आहे. ही मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचेल. तेथे दुपारी १२.१५ वाजता श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ गुरू शांतिनाथ यांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी मंडळातर्फे साडेतीन शक्तिपीठांपैकी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
मानाचा तिसरा – श्री गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशाची मिरवणूक गुलाल उधळून सकाळी ११ वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिरापासून होणार आहे. स्वप्निल आणि सुभाष सरपाले या बंधूंनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून ही मिरवणूक निघणार असून, या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान, शिवतेज, शिवरुद्र, शिव ताल, रुद्रतेज, कलावंत ढोल ताशा पथके सहभागी होणार आहे.
ही मिरवणूक मंदिरापासून गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौक, गुरुजी तालीम गणपती चौकातील उत्सव मंडपात येणार आहे. दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी उद्योजक पुनीत आणि जान्हवी बालन यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.
मानाचा चौथा – श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ
मानाचा चौथा असलेल्या श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे आगमन रविवारीच (१३ सप्टेंबर) उत्सव मंडपात होणार आहे. हा सोहळा उद्योजक पुनीत आणि जान्हवी बालन यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी श्रींची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे.
गणपती मंदिरापासून गणपती चौक, लक्ष्मी रस्ता, नगरकर तालीम चौक, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी गणपती, मजूर अड्डा चौक, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, समाधान चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे गणपती चौकातून उत्सव मंडपात येईल.
दुपारी साडेबारा वाजता अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
गणेशोत्सवाची प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सकाळी ९:०० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात होणार आहे. प्रथेप्रमाणे पालखीतून मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक रमणबाग चौकातून मिरवणूक शिंदेपार चौक, ओंकारेश्वर मंदिर, वर्तक उद्यान, नारायण पेठ पोलीस चौकी, न.चिं. केळकर रस्त्याने उत्सव मांडपात दाखल होईल.
मिरवणुकीत बिडवे बंधू यांचा सनई, चौघडा, श्रीराम व कलावंत ढोल-ताशा पथकांचा समावेश असेल. सकाळी ११:४५ वाजता रौणक रोहित टिळक यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती कौस्तुभ खळीकर पौराहित्य करणार आहेत. यावेळी केसरी गणेशोत्सवाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उत्सवाच्या संयोजिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त प्रणति रोहित टिळक उपस्थित असणार आहेत.
दगडूशेठ गणपतीची मयूर रथातून श्रींची आगमन मिरवणूक
वृंदावनच्या प्रेम मंदिरात होणार विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या वृंदावन येथील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सोमवारी (दि. १४) सकाळी ११.११ वाजता उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून श्रींची आगमन मिरवणूक काढली जाईल.
फुलांनी आकर्षकपणे सजविलेल्या मयूर रथातून श्रींची ही मिरवणूक निघेल. यामध्ये गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड सहभागी होणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ वाजल्यापासून उत्सवमंडपात भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मंदिराची प्रतिकृती विविध फुलांनी आणि सजावटीने साकारण्यात आली आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसाठी श्रीगणेश सुवर्णधाम
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यावर्षीही धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या उत्सवात श्रीगणेश सुवर्णधाम या संकल्पनेवर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. गणेश आणि कार्तिकेय यांच्यात पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा झाली.
मात्र, श्रीगणेशांनी आई-वडिलांनाच पृथ्वी मानून त्यांची पूजा केली, या कथेतून आई-वडिलांचे महत्त्व आणि संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे उत्सवप्रमूख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगमन मिरवणुकीत आठ ते नऊ ढोल-ताशा पथके, मर्दानी खेळ, शंखवादक असतील. सकाळी ०८:१५ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. दुपारी १२:३० वाजता लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच १६ सप्टेंबरला सकाळी ११:०० वाजता तब्बल ११ हजार विद्यार्थी शाळांमधून ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे पठण करणार असल्याची माहितीही बालन यांनी दिली.
हेही वाचा:
Asha Buchke : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा





