Road Show: माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान अपघात; भाजप नेत्याच्या मुलाचा मृत्यू
Road Show: नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको करत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

Road Show: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav Road Show) यांच्या रोड शोदरम्यान गोरखपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी आलेल्या जेसीबीची धडक भाजप नेत्याच्या मुलाला बसल्याने १४ वर्षीय विद्यार्थी आर्यवर्धन सिंह याचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वडील ओंकार सिंह श्रीनेत हे भाजप नेते आहेत. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको केला.
या घटनेनंतर अखिलेश यादव आणि आयोजक समितीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे गोरखपूर विमानतळापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुतात्म्यांची भूमी चौरी-चौरा येथील देवकही गावी जाण्यासाठी रथ यात्रेवर निघाले होते.
त्यांच्या स्वागतासाठी कुडाघाट येथे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेसीबी लावून फुलांच्या माळांनी स्वागत करण्याची तयारी केली होती. अखिलेश यादव यांचा ताफा तिथे पोहोचल्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून त्यांना फुलांची माळ घालण्यात आली आणि फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ताफा पुढे निघून गेला.
याच दरम्यान स्थानिक रहिवासी आणि भाजप नेते ओंकार सिंह श्रीनेत यांचा १४ वर्षीय मुलगा आर्यवर्धन सिंह हा स्कूटीवरून रस्ता ओलांडत होता. तो इयत्ता १० वीचा विद्यार्थी होता. आरोप आहे की, याच वेळी त्याला जेसीबीची धडक बसली आणि रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अखिलेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी… (Akhilesh Yadav Road Show)
नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. अपघातामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको केला. त्यांनी अखिलेश यादव आणि आयोजक समितीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत (Akhilesh Yadav Road Show)
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. तसेच, पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री योगी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गोरखपूरला येणार आहेत. या दरम्यान ते मृत मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय कार्यक्रमांमधील सुरक्षा व्यवस्था, अवजड वाहनांचा वापर आणि गर्दीचे व्यवस्थापन याबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा:






