Rupam Ghuge : शायना एनसी यांच्यावर शाईफेक करणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस; ठाकरे गटाच्या महिला नेत्याची मोठी घोषणा
Rupam Ghuge : रूपम घुगे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप करत या कृतीचा तीव्र निषेध केला.

Rupam Ghuge : सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील काही दाव्यांवरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवर आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाच्या सहा प्रवक्त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेदरम्यान पुस्तक फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, याचवेळी शायना एनसी यांच्या हातून दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चुकून फाटला गेला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणी शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र, ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी शायना एनसी यांच्याविरोधात संताप व्यक्त करत, त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
रूपम घुगे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याचा आरोप करत या कृतीचा तीव्र निषेध केला. “ज्या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान केला आहे, त्यांनी त्यांच्या फोटोला हातही लावू नये,” असे त्या म्हणाल्या. शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडण्याचे धाडस केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित कृतीबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे पुढे कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





