MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम
MPSC Protest:

MPSC Protest: एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी शहरात सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवारी सायंकाळी नवे वळण मिळाले. आंदोलनस्थळी पोलीस व्हॅनमधून ध्वनिक्षेपकाद्वारे आंदोलकांना जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, आमदार रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार देत विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली.
आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार उपस्थित आहेत. पोलिसांकडून वारंवार जागा रिकामी करण्याचे आवाहन केले जात असल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आंदोलनामुळे वाहतूक आणि नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाचा मुद्दा पोलिसांकडून मांडला जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून न घेता आंदोलनस्थळ रिकामे करण्याच्या सूचना देणे योग्य नाही, अशी भूमिका आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे.
एमपीएससीच्या परीक्षांमधील पारदर्शकता, परीक्षेची पद्धत, रिक्त पदांची भरती आणि आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलकांतील पुढील चर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो की आंदोलन आणखी तीव्र होते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.





