Accident News : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू
Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेवर भीषण बस अपघात झाला असून ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला.
हिमाचल पथ परिवहन निगमची (HRTC) प्रवासी बस अचानक खोल दरीत कोसळल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओही समोर आला असून, पाहणाऱ्यांचे काळीज थरथरून जाते.
अपघात कसा घडला?
शिमला जिल्ह्यातील चौपाल उपमंडळातून पाँटा साहिबकडे जाणारी नेरवा डेपोची बस मंगळवारी सकाळी सुमारे 6:30 वाजता प्रवासासाठी निघाली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उत्तराखंडमधील कालसीजवळील कुआनु-मीनाक मार्गावर, सुदोई खाड परिसरात ही बस पोहोचली.
हा रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक असल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला वाट देताना चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी डोंगराची कडा खचली आणि चालकाचा ताबा सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस थेट खोल दरीत कोसळली.
दुर्गम भागात बचावकार्यात अडथळे
अपघातस्थळ अतिशय दुर्गम आणि खोल दरीचे असल्यामुळे बचावकार्यात सुरुवातीला मोठ्या अडचणी आल्या. घटनेची माहिती मिळताच SDRFच्या डाकपत्थर, चकराता आणि त्यूणी येथील पथके घटनास्थळी दाखल झाली.
स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी दोरखंडांच्या साहाय्याने दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. चिखल, झाडी-झुडपे आणि अरुंद वाटांमुळे जखमींना रस्त्यापर्यंत आणताना बचाव पथकांची मोठी कसरत झाली.
Devastating news from Kwanu-Minas road in Dehradun. HRTC bus with over 30 passengers met with an accident in Kalsi, Uttarakhand. 3 people confirmed dead (2 women, 1 man) and nearly 35 injured. Locals are helping with rescue ops rn. This is just tragic. 🙏 pic.twitter.com/xU2OLQLOoi
— Himalayan Hindu (@himalayanhindu) February 3, 2026
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून जखमींना तातडीचे उपचार मिळतील याचे निर्देश दिले. गरज भासल्यास गंभीर जखमींना हवाई मार्गे मोठ्या रुग्णालयात हलवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी HRTC अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जखमींवर उपचार सुरू; मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू
सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून, त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. बसचे वाहक जगदीश चंद यांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 हून अधिक प्रवासी होते.
या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, डोंगराळ भागातील अरुंद आणि असुरक्षित रस्त्यांवरील प्रवास पुन्हा एकदा धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.





