Diwali: नव्या प्रकाशपर्वाची उद्यापासून सुरुवात
Diwali:

यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्र
Diwali: दिव्यांची करूनिया उजळण दीपावली ही आली, लक्ष लक्ष दिव्यांचा झगमगीत साज ही ल्याली, अशा या नव्या प्रकाशपर्वाची अर्थात दीपोत्सवाची सुरुवात गुरुवारपासून (दि. ५) होत आहे.
रमा एकादशी आणि वसुबारस हे दोन सण एकत्रित असून, रविवारी (८ नोव्हेंबर) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्र आले आहे. असे असले तरी यंदाची दिवाळी सात दिवस राहणार आहे. त्या अर्थाने पाच ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा सण साजर करण्यात येणार आहे.
सणांचा राजा असलेला दिवाळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दीपमाळ, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई, झगमगाट, नवे कपडे, फराळ या सगळ्यांची रेलचेल या काळात असते. नरक चतुदर्शी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे तीन दिवस नागरिकांनी मौजमजा करावी, गोडधोड खावे, आनंदी वातावरणात राहावे, असे आवाहन ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी केले आहे.
रमा एकादशी, वसुबारस (गुरुवार ५ नोव्हेंबर)
रमा एकादशीला दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित केला जातो. एकादशी आणि गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस हे दोन सण एकत्र आले आहेत. या दिवशी अनेक सुहासिनी एकवेळ जेवण करून उपवास करतात. सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे सूर्यास्तानंतर पूजन करतात.
या दिवशी दूध, दुग्धजन्य पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाय उपलब्ध नसते. अशा वेळेस गाय- वासराच्या मूर्तीचीदेखील पूजा करता येते. तेही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. अनेक लोकप्रतिनिधी व संस्था हल्ली चौकांमध्ये, मोकळ्या जागांमध्ये गाय वासरू पूजेसाठी उपलब्ध करून देतात.
धनत्रयोदशी, यमदीप दान (शुक्रवार, ६ नोव्हेंबर)
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी यमदीपदान केले जाते. आरोग्य प्राप्तीसाठी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचेही पूजन केले जाते. घरातील अलंकार, धने, सोने- नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते.
नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन (रविवार, ८ नोव्हेंबर)
नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने १६ हजार १०८ स्त्रियांना बंदीवासातून या दिवशीच मुक्त केले. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला, की आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संक्रमणकाळ बाधू नये, यासाठी तसेच येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते.
शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळ अमावस्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावस्या शुभ आहे. आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते, अशी धारणा आहे.
जेथे स्वच्छता, आनंद आहे, अशा ठिकाणी ती रमते आणि वास करते असे म्हणतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनानिमित्त घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.
लक्ष्मीपूजन मुहूर्त
सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५०
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – (मंगळवार, १० नोव्हेंबर)
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते.
व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
वहीपूजन मुहूर्त
पहाटे २.१० ते ५.१०, सकाळी ६.३५ ते ७.२५, सकाळी ११ ते दुपारी २
यमद्वितीया (भाऊबीज) – (बुधवार, ११ नोव्हेंबर)
नरक चतुर्दशी, अमावास्या आणि बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या दिवसांत गणली जाते.
कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिने बनवलेले भोजन करून बहिणीचा सन्मान करत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याचे औक्षण करावे, असे सांगितले आहे. या दिवशीसुद्धा यमतर्पण करावे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात, तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे हिंदू धर्माची पताका पोहोचली आहे, तेथे दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीमध्ये पतीने पत्नीला, भावाने बहिणीला, मालकांनी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे, यामुळे संपूर्ण समाजात कुटुंबात एकोपा राखला जातो.
– मोहन दाते, दाते पंचागकर्ते





