Abishek Porel Bail : बलात्कार आणि धमकी प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूला अखेर जामीन! नेमकं काय प्रकरण?
Abishek Porel Bail : बलात्काराच्या कथित प्रकरणात ३६ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला जामीन मंजूर झाला आहे. त्याला ११ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

Delhi Capitals Cricketer Abishek Porel Granted Bail In Rape Case After 36 Days In Jail : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून खेळणारा बंगालचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलला (Abishek Porel) बलात्काराच्या कथित प्रकरणात अखेर दिलासा मिळाला आहे. एका महिन्याहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर हुगळीतील चिनसुराह न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. कर्नाटकच्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीने केलेल्या गंभीर तक्रारीनंतर ११ ऑगस्ट रोजी पोरेलला अटक करण्यात आली होती. तब्बल ३६ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर आता त्याचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लग्नाचे आमिष अन् फसवणूक; पीडितेने मोगरा ठाण्यात दिली होती तक्रार!
तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, ती गेल्या साडेतीन वर्षांपासून अभिषेक पोरेलसोबत प्रेमसंबंधात होती आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात ते एकत्र परदेशातही गेले होते. मात्र, नंतर पोरेलने लग्नाला नकार दिल्याने तिने २३ जून रोजी मोगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ (लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध), ३११, ३१८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ आणि ७२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
हायकोर्टाच्या आदेशानंतर अटक; ३६ दिवसांनंतर चिनसुराह कोर्टाकडून जामीन!
IPL Cricketer Abishek Porel Arrested In R@pe Case After Medical Student’s Complaint, Spent A Month In Jail Before Finally Getting Bail
One complaint, an arrest, a rejected bail plea and over a month behind bars, all before Abishek Porel’s guilt was established.
The 23-year-old… pic.twitter.com/OFfTsmnvI2
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) September 19, 2026
हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर कोर्टाने पोलिसांना पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले होते. तक्रारदाराचे खाजगी फोटो व्हायरल होण्याच्या संशयावरून न्यायालयाने पोरेलचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसही जप्त करण्याचे आदेश दिले होते. अटकेनंतर सुरुवातीला कनिष्ठ न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे त्याला तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. अखेर ३६ दिवसांच्या कोठडीनंतर चिनसुराह कोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. पोरेलने सुरुवातीपासूनच आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कारकीर्द!
२३ वर्षीय अभिषेक पोरेल २०२३ पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये ३५ सामन्यांत १४५.३७ च्या स्ट्राईक रेटने ४ अर्धशतकांसह ७६९ धावा केल्या आहेत. २०२१-२२ च्या मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पोरेलने बंगालसाठी आतापर्यंत ३२ प्रथम श्रेणी आणि २३ लिस्ट-ए सामने खेळत देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.





