Akash Deep Revealed : राहुल द्रविडचा मेसेज आला अन् आकाश दीपने दुर्लक्ष केले! पदार्पणाच्या आदल्या रात्री घडला होता अजब किस्सा
Akash Deep Revealed : आकाश दीपने एका शो दरम्यान खुलासा केला करताना सांगितले की, त्याने राहुल द्रविड यांच्या एका खास मेसेजकडे का दुर्लक्ष केले होते.

Akash Deep Revealed Why Ignored Rahul Dravid Debut Text Message : दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) सध्या तंदुरुस्तीवर कसून मेहनत घेत असून त्याची नुकतीच इराणी करंडकासाठी ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात निवड झाली आहे. भारताकडून १० कसोटी सामने खेळणाऱ्या या गोलंदाजाने २०२४ मध्ये कसोटी पदार्पण केले होते. मात्र, त्या ऐतिहासिक पदार्पणाच्या आदल्या रात्री घडलेला एक अत्यंत रंजक किस्सा आकाश दीपने एका मुलाखतीत सांगितला आहे. तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पाठवलेला अत्यंत महत्त्वाचा मेसेज आपण नकळतपणे कसा दुर्लक्षित केला, याची कबुली त्याने दिली.
‘तू उद्या खेळणार आहेस’; नंबर सेव्ह नसल्याने मेसेजकडे केले दुर्लक्ष!
पदार्पणाच्या कसोटीच्या आदल्या दिवशी राहुल द्रविड यांनी आकाश दीपला वैयक्तिक मेसेज करून तो सामना खेळणार असल्याची गोड बातमी दिली होती. आकाश दीपने सांगितले की, “द्रविड सरांचा फोन नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह नव्हता. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंना येणाऱ्या नेहमीच्या मेसेजसारखाच हा काहीतरी सामान्य मेसेज असेल, असे समजून मी त्याकडे लक्ष दिले नाही.”
११ तास घालवले संभ्रमात; नंतर चूक समजताच द्रविड सरांना केला फोन!
या एका गैरसमजामुळे आकाश दीपने तब्बल ११ ते १२ तास प्रचंड अस्वस्थतेत आणि संभ्रमात घालवले. आपण दुसऱ्या दिवशी देशासाठी पदार्पण करणार आहोत की नाही, याची त्याला खात्री पटत नव्हती. जेव्हा त्याने तो मेसेज पुन्हा काळजीपूर्वक तपासला, तेव्हा तो नंबर प्रत्यक्ष राहुल द्रविड सरांचाच असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने द्रविड यांना फोन करुन नंबर सेव्ह नसल्याबद्दल माफी मागितली.
‘आयुष्यातील सर्वात मोठी संधी’; पाच दिवसांत घेतली २२ वर्षांची परीक्षा!
आपली निवड झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आकाश दीप म्हणाला, “हा क्षण माझ्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा होता. वयाच्या २२-२३ वर्षांपर्यंत घेतलेल्या कठोर मेहनतीची आणि संघर्षाची ती खरी कसोटी होती.” इराणी करंडकाच्या माध्यमातून दमदार पुनरागमन करून पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे.





