Omraje Nimbalkar : रात्रीस खेळ चाले…! श्रीकांत शिंदेंचा डाव अन् विशेष विमानाने पुण्याहून ओमराजे निंबाळकर दिल्लीत
Omraje Nimbalkar : श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने पुणे विमानतळावर सज्ज

Omraje Nimbalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नऊपैकी किमान सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता असलेल्या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश असल्याचे समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशापेक्षा निष्ठेला किंमत असल्याचं सांगत आपण कायम ठाकरेंसोबत राहणार असल्याचं निंबाळकर यांनी जाहीर सभांतून सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्याही पक्षांतराची चर्चा होऊ लागली असून मध्यरात्री १ वाजता पुणे विमानतळावरून ते दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. (Omraje Nimbalkar)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने पुणे विमानतळावर दोन विमाने बुक करण्यात आली होती. खरं तर काल दुपारीच यातील एका विमानाने ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना होणार होते. मात्र नंतर या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आणि मध्यरात्री १ वाजता गुप्तपणे ते दिल्लीकडे रवाना झाले.
या विशेष विमानाने केवळ ओमराजे निंबाळकरच गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत महायुतीचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हे देखील दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
तीन वेळा प्लॅनमध्ये बदल (Omraje Nimbalkar)
समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती.
ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याचा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता आणि काल दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत तब्बल तीन ते चार वेळा बदल करण्यात आला. आधी दुपारी ३ वाजता दिल्लीला जाण्याचे ठरले होते.
त्यात बदल करून संध्याकाळी ५ ची वेळ निश्चित झाली. यात पुन्हा बदल करत रात्री ९ वाजता उड्डाण करण्याचे ठरले. त्यानंतर अंतिम उड्डाण अखेर सर्व गुप्तता पाळत, रात्री १ वाजता खाजगी विमानाने पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केले.
२० जून रोजी निकालाची शक्यता
ओमराजे निंबाळकर मुलाचं आजारपण आणि वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालासाठी कुटुंबासह पुण्यात होते. संपूर्ण कुटुंबासह ओमराजे निंबाळकर पुण्यात गेल्याची माहिती आहे.
ओमराजे निंबाळकर यांचे वडील आणि काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्यासह चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या तब्बल दोन दशकांपूर्वीच्या प्रकरणाचा निकाल येत्या २० जून रोजी लागण्याची शक्यता आहे.
कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील
हेही वाचा:






