Sanjay Raut : रात्री 11 वाजता फोनवरुन मिळाली फुटीची खबर ? संजय राऊत म्हणाले…
Sanjay Raut : कोणी दिल्लीत असल्याचे सांगत आहे, तर कोणी मतदारसंघात असल्याचे म्हणत आहे. मात्र हे सर्व खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निवडून आले आहेत.

Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. पक्षफोडीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी गंभीर आरोप करत मोठा दावा केला.
राऊत म्हणाले, “आजही आमची नियमित बैठक झाली. माझ्यासोबत गटनेते अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई आणि इतर सहकारी उपस्थित होते. कालपासून विविध प्रकारच्या अफवा आणि बातम्या सुरू आहेत. मात्र, आमच्यापर्यंत अशा कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती आलेली नाही. माध्यमांतूनच आम्ही या बातम्या पाहत आणि ऐकत आहोत.”
खासदारांना विकत घेण्याचे प्रयत्न? (Sanjay Raut)
राऊत पुढे बोलताना म्हणाले, “काल रात्री एका महत्त्वाच्या व्यक्तीने मला सांगितले की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी विचारले, ‘भाव काय आहे?’ त्यावर उत्तर मिळाले की ‘हमीभाव 50 कोटी रुपये आहे.’ तसेच काही खासदारांना आधी 15 ते 20 कोटी रुपये देण्याची चर्चा असल्याचेही सांगण्यात आले,” असा दावा राऊत यांनी केला.
खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्या खासदारांची नावे चर्चेत आहेत, ते सध्या नेमके कुठे आहेत याचीही स्पष्ट माहिती नाही. कोणी दिल्लीत असल्याचे सांगत आहे, तर कोणी मतदारसंघात असल्याचे म्हणत आहे. मात्र हे सर्व खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निवडून आले आहेत.”
राऊतांचा इशारा (Sanjay Raut)
“उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बळावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जनादेशाशी बेईमानी करण्याचा अधिकार नाही. पैशांच्या जोरावर पक्षफोडीचे प्रयत्न होत असतील, तर जनता ते सहन करणार नाही. शिवसैनिकही गप्प बसणार नाहीत,” अशा इशारा संजय राऊतांनी दिला. ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असून, दिल्लीतील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






