कोल्हापूर | कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून सध्या जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असतानाच, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केलेल्या एका सूचक विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. “पडद्यामागे खूप काही सुरू आहे, पण सर्वच आता जाहीर करू शकत नाही,” असे म्हणत पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. शिंदेंसमोर पर्यायांची चाचपणी? मुंबईच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्याचे प्रयत्न झाल्यास, राज्यात इतर ठिकाणी सत्तेसाठी शिंदेंकडे अनेक पर्याय खुले असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापुरात हीच समीकरणे जुळवून पाहण्याची शक्यता सतेज पाटील यांच्या विधानातून अधोरेखित झाली आहे. भाजपसोबतच्या संघर्षात शिंदे गट काँग्रेसचा हात धरणार का? या चर्चेला आता उधाण आले आहे. सत्तेचे गणित काय सांगते? कोल्हापूर महानगरपालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सतेज पाटील यांनी मांडलेले समीकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेसचे बळ: ३४ जागा शिवसेना (शिंदे गट): १५ जागा या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास हा आकडा ४९ वर पोहोचतो, जो सत्ता स्थापनेसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो. “पडद्यामागे हालचाली सुरू” सतेज पाटील यांना या संभाव्य युतीबाबत विचारले असता, त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. मात्र, “पडद्यामागच्या हालचालींची खुली चर्चा करता येत नाही,” असे म्हणत त्यांनी सस्पेंस कायम ठेवला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले, तरी स्थानिक पातळीवर सत्तेसाठी नवीन समीकरणे जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? 81 नगरसेवक संख्या असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत काॅंग्रेसला 34, भाजप 26, शिंदेसेना 15, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार 4, ठाकरेसेना 1, आणि इतर एक अशा जागा मिळालेल्या आहेत.