कोल्हापूर महानगरपालिकेचा अंतिम निकाल जाहीर; अवघ्या 3 जागांमुळे ‘या’ पक्षाच्या हातून सत्ता निसटली

कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि महायुती यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत पाटील यांनी ३७ जागा जिंकून काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष बनवले, मात्र अवघ्या तीन जागांच्या कमतरतेमुळे सत्ता त्यांच्या हातून निसटली.
काँग्रेसची एकाकी झुंज
आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ या मोहिमेद्वारे निवडणूक एकहाती अंगावर घेतली होती. काँग्रेसने 81 पैकी ७५ उमेदवार मैदानात उतरवले होते, त्यापैकी ३७ विजयी झाले. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) केवळ एका जागेवर मर्यादित राहिल्याने सतेज पाटलांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येथे खातेही उघडता आले नाही.
महायुतीची सरशी
महायुतीच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ताकद पणाला लावली होती. महायुतीत भाजपने २४ जागा मिळवत मोठे यश संपादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. जनसुराज्यच्या एका जागेसह महायुतीचा आकडा ४३ वर पोहोचला असून त्यांनी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे.
हायव्होल्टेज लढतींचे निकाल –
प्रभाग ९ मध्ये शिंदे गटाच्या शारंगधर देशमुख यांनी सतेज पाटलांच्या उमेदवाराचा पराभव करत मोठा धक्का दिला. तसेच प्रभाग ७ (ड) मध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय मिळवला. कोल्हापूरची ही निवडणूक ‘रस्त्यावरचा कार्यकर्ता विरुद्ध प्रस्थापित’ अशी रंगली होती, ज्यामध्ये अखेर महायुतीने बाजी मारली आहे.





