भोपाळ: मध्य प्रदेशात ‘एसआयआर’ अंतर्गत मतदार यादीचा नवीन प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील ४२ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, एकट्या राजधानी भोपाळमध्येच ४ लाख ३८ हजारांहून अधिक मतदारांची नावे कापली गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण ५ कोटी ७४ लाख मतदारांपैकी ५ कोटी ३१ लाख मतदारांनी आपली गणना पत्रके सादर केली होती. पडताळणीअंती एकूण ४२ लाख ७४ हजार १६० मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही स्थलांतरित किंवा अनुपस्थित असलेल्या मतदारांची आहे. साधारण ३१.५१ लाख मतदार स्थलांतरित आढळले आहेत, तर ८.४६ लाख मतदारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय २.७७ लाख मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याने ती कमी करण्यात आली आहेत. राजधानी भोपाळमधील आकडेवारी पाहिली असता, जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी जाहीर केल्यानुसार जिल्ह्यात आता केवळ १६ लाख ८७ हजार मतदार शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी ही संख्या २१ लाखांच्या वर होती. भोपाळमधील गोविंदपुरा आणि नरेला या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक नावे वगळण्यात आली आहेत. गोविंदपुरा मतदारसंघातून ९७ हजार, नरेलातून ८१ हजार तर मध्य विधानसभा मतदारसंघातून ६७ हजार मतदारांची नावे कमी झाली आहेत. हुजूर आणि दक्षिण-पश्चिम भोपाळमध्येही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली असून बैरसियामध्ये सर्वात कमी म्हणजेच १२ हजार नावे वगळली आहेत. ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत किंवा ज्यांना नवीन नावे नोंदवायची आहेत, त्यांच्यासाठी दावे आणि हरकती नोंदवण्याची प्रक्रिया २२ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या अर्जांची रीतसर चौकशी केल्यानंतर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.