Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात एसआयआर नंतर मतदार संख्येत मोठी भर; एकूण मतदार संख्या तब्बल ‘इतक्या’ कोटींवर
उत्तर प्रदेशात राबवण्यात आलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर राज्याच्या मतदार यादीत नवीन मतदारांची भर पडली आहे.

Uttar Pradesh – उत्तर प्रदेशात राबवण्यात आलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर राज्याच्या मतदार यादीत ८४ लाखांहून अधिक नवीन मतदारांची भर पडली आहे.
या वाढीसह राज्यातील एकूण मतदारांची संख्या आता १३ कोटी ३९ लाख ८४ हजार ७९२ इतकी झाली असून, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
२७ ऑक्टोबर २०२५ पासून तब्बल १६६ दिवस चाललेल्या या मोहिमेत राज्यातील ४०३ विधानसभा मतदारसंघांमधील १.७७ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्सनी सहभाग घेतला होता. जानेवारीतील मसुदा यादीत ही संख्या १२.५५ कोटी होती, जी आता अंतिम प्रक्रियेनंतर लक्षणीयरीत्या वाढली आहे.
नव्या आकडेवारीनुसार, एकूण मतदारांमध्ये ७.३० कोटी पुरुष, ६.०९ कोटी महिला आणि ४,२०६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मोहिमेचे मुख्य यश म्हणजे तरुण मतदारांचा वाढलेला टक्का आणि सुधारलेले लिंगगुणोत्तर. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ३.३३ लाखांवरून थेट १७.६३ लाखांवर पोहोचली आहे.
तसेच, प्रति हजार पुरुषांमागे महिला मतदारांचे प्रमाण ८२४ वरून ८३४ झाले आहे. जिल्ह्यांचा विचार करता प्रयागराजमध्ये सर्वाधिक ३.२९ लाख नवीन मतदारांची नोंद झाली असून, विधानसभा मतदारसंघ स्तरावर गाझियाबादमधील साहिबाबादमध्ये सर्वाधिक ८२,८९८ मतदारांची भर पडली आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटचीही मदत घेण्यात आली असून, कोणाचेही नाव विनाकारण वगळण्यात आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या अंतिम यादीबाबत काही तक्रार असल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ दिवसांच्या आत पहिले अपील, तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ३० दिवसांच्या आत दुसरे अपील करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.






