Prashant Jagtap Join Congress: ‘राजकारण बंद करेन, पण काँग्रेस सोडणार नाही’; माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
Prashant Jagtap Join Congress : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे जाहीररीत्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांना गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
“भाजपला टक्कर देणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष”
पक्षप्रवेशानंतर बोलताना जगताप भावनिक झाले. ते म्हणाले, “मी २६ वर्षे शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो, परंतु आताची लढाई भाजप आणि संघ विचारधारेच्या विरोधात आहे. भाजपला खऱ्या अर्थाने टक्कर देण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे. मी राजकारण बंद करेन, पण आता काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही.”
राष्ट्रवादी सोडण्याचे मुख्य कारण –
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. भाजपची साथ देणाऱ्यांसोबत आघाडी करणे जगताप यांना मान्य नव्हते. “ज्यांनी भाजपला साथ दिली, त्यांच्यासोबत मी जाऊ शकत नाही,” असे म्हणत त्यांनी पुरोगामी विचारांच्या काँग्रेसची निवड केली.
पुण्याच्या राजकारणावर होणारा परिणाम –
प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी पकड असून, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुण्यात पक्षाचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा गेल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रशांत जगताप यांचा प्रवास:
- १९९९ पासून राष्ट्रवादीत सक्रिय, सलग तीन वेळा नगरसेवक.
- २०१६-१७ मध्ये पुण्याचे महापौर म्हणून कार्यभार.
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष म्हणून आक्रमक आंदोलने.
- २०२४ ची विधानसभा निवडणूक हडपसरमधून लढवली.





